वाढलेल्या टेस्टमुळे कोरोना बाधितांची संख्या वाढलेली दिसत आहे, जनतेने घाबरु नये : गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई


वाढलेल्या टेस्टमुळे कोरोना बाधितांची संख्या वाढलेली दिसत आहे, जनतेने घाबरु नये. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे जनतेला आवाहन.


पाटण / प्रतिनिधी :


दि.01 ऑगस्टपासून सातारा जिल्हा अनलॉक करण्यात आलेला आहे. कोरोनाच्या टेस्ट घेण्याचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत देखील वाढ होवू लागली आहे.परंतू कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले असल्यामुळे जनतेने घाबरण्याचे कारण नाही. जनतेने घाबरुन न जाता आता जिल्हा अनलॉक झाला आहे म्हणून बाहेर फिरत बसण्यापेक्षा कामानिमित्तच घराच्या बाहेर पडा व स्वत:ची काळजी घ्या असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.


        काल पाटण जि.सातारा येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली कोरोना आजाराच्या उपाययोजना व अनलॉक काळात प्रशासनाने घ्यावयाची काळजी यांसदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील,जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत,डॉ.सुधीर धुमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये,पाटण प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,सहा.गटविकास अधिकारी विजय विभूते,पाटण नगरपंचायत मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, तालुका वैद्यकीय अधिकारी रघूनाथ पाटील,ग्रामीण रुग्णालय वैद्यकीस अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.


         प्रारंभी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोनाच्या संदर्भातील आढावा घेतला.यामध्ये काही त्रुटी आढळल्या त्याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी सुचना केल्या.पाटण तालुक्यात संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये काही त्रुटी होत्या त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सुचना देत संस्थात्मक विलगीकरण कक्षांची वाढ करावयाची असल्यास आवश्यक सोईसुविधांनी युक्त अशा ठिकाणी हायरिस्कमधील लोकांचे विलगीकरण करावे. हायरिस्कमधील लोकांचे विलगीकरण करताना त्यांना वेळेवर जेवण त्यांची राहण्याची सोय होते का नाही याची महसूल तसेच आरोग्य प्रशासनाने तपासणी करावी. संस्थात्मक विलगीकरण कक्षांच्या बाहेर अद्यावत अशा रुग्णवाहिका तैनात करण्यात याव्यात.पाटण सारख्या शहरात खाजगी डॉक्टरांच्या हॉस्पीटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार होतील याची सोय करावी लागली तर ती करावी.


           दि.01 ऑगस्टपासून जिल्हा अनलॉक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे गर्दीत वाढ होणार आहे. प्रशासनाने याची काळजी घेणे गरजेचे आहे. अनलॉकच्या काळात प्रशासनावर आता जादाचा भार पडणार असला तरी समन्वयाने कुठेही वाद विवाद होणार नाही याची दक्षता विशेषत: आमचे पोलीस विभागाने घ्यावी. अनलॉकमुळे कोरोनाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होणार असल्याने आपण सतर्क राहिलो तर जनताही सतर्क राहील. त्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात असे त्यांनी बैठकीत सांगितले.


          दरम्यान सातारा जिल्हयातील सर्व जनतेला आवाहन करताना त्यांनी अनलॉकमुळे कामाव्यतिरिक्त कुणीही घराच्या बाहेर पडू नये, स्वत:च स्वत:ची आणि आपल्या कुटुंबांची काळजी घ्या. कोरोना टेस्ट वाढविण्यात आल्याने आपल्याला कोरोना रुग्णांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.परंतू यातून बरे होणाऱ्यांची संख्याही चांगली आहे त्यामुळे कुणीही घाबरुन जावू नका, सातारा जिल्हयातील सर्व प्रशासन आपली काळजी घेणेकरीताच गेली चार महिने कशोशीने प्रयत्न करीत आहे.सातारा जिल्हयातील जनतेनेही आपल्या सुरक्षिततेसाठी जिल्हयातील असो वा तालुकास्तरावरील सर्व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी या बैठकीत केले.


         दरम्यान अनलॉकच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या वतीने सातारा जिल्हयात कोणकोणत्या उपाययोजना महसूल, पोलीस व आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्या आहेत याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बैठकीत दिली. उपस्थितांचे स्वागत प्रातांधिकारी श्रीरंग तांबे व आभार तहसिलदार समीर यादव यांनी मानले.