कोयना धरणातील १०० टीएमसी शिवसागर जलाशयाचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंचे हस्ते ओटी भरण व जलपुजन.


कोयना धरणातील १०० टीएमसी शिवसागर जलाशयाचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंचे हस्ते ओटी भरण व जलपुजन.


पाटण दि.३१: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयामध्ये 100 टीएमसीहून अधिक पाणीपातळी ओलंडल्यानंतर सोमवार दि.31,ऑगस्ट,2020 रोजी सकाळी १०१.५७ टीएमसी पाणीसाठा असताना कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे ओटीभरण व जलपुजन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते आज सकाळी ११.०० वा करण्यात आले. कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग व्यवस्थापनाकडून पुर्णत: कमी करण्यात आला आहे. आजअखेर कोयना धरणातून सहा वक्र दरवाज्यातून पुरपरिस्थितीत १९.६५ टीएमसी तर पायथा विद्यूतगृहातून १.८६ टीएमसी इतका पाण्याचा विसर्ग यंदा केला आहे.


           यावेळी कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कोयनानगरचे सपोनी महेश बावीकट्टी, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,माजी सरपंच शैलेंद्र शेलार, अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. एकूण 105 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या कोयना धरणात दि. 31 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी १०१.५७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.


              प्रतिवर्षी दि.15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पुर्ण करणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने यंदा दि.31 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा ओलंडला. 100 टी.एम.सी.ने धरण भरल्यानंतर दरवर्षी प्रथेप्रमाणे कोयनामाईची ओटी भरुन पूजन करण्यात येते.आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते याठिकाणी विधीवत पुजा करुन कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे ओटीभरण व जलपुजन करण्यात आले. दरम्यान दि.०१ जुनपासून आजअखेर कोयना धरणाच्या टप्पा क्रं.१ व २ मधून २७२.५ मेगॉवॅट, टप्पा क्रं.३ मधून १४४.५ मेगॉवॅट, टप्पा क्रं. ४ मधून १६५.८ मेगॉवॅट, व पायथा विद्युतगृहातून ३७.९ मेगॉवॅट इतकी वीजनिर्मिती करण्यात आली आहे.


          याप्रसंगी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून आपल्या कोयनामाईकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. विशेषत: सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर या भागाचा तसेच शेजारच्या कर्नाटक आंधप्रदेश या दोन राज्यांतील पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न कोयना धरणामुळे मोठया प्रमाणांत सुटतो. सातारा जिल्हयाला विशेषत: वरदान असणारं हे कोयनेचे धरण स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कल्पनेने त्यांच्या प्रेरणेने याठिकाणी पुर्ण झाले. सुमारे 2000 मेगावॅट विजेची निर्मिती याच जलाशयातल्या पाण्यावरती करण्यात येते.आज जलपूजनच्या निमित्ताने मी कोयना माईची आराधना केलेली आहे आणि कोयनामाईकडे गारऱ्हाने मांडलं आहे की असचं या संपूर्ण महाराष्ट्रावरती पिण्याच्या, शेतीच्या व औद्योगिकीकरणाच्या पाण्यासाठी लागणारी जी तहान आहे ती कोयनामाईनं अशाचप्रकारे पुर्ण करावी.कोयना धरणामुळे जी हरीत क्रांती झालेली आहे त्याची अशीच भरभराटी व्हावी अशी प्रार्थना केली आहे.


         पाटण मतदारसंघातील तमाम जनतेने मला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यामुळे राज्यातील सर्वात मोठया आपले कोयना धरणातील जलाशयाचे जलपुजन व ओटीभरण करण्याची संधी मला गत सात,आठ वर्षापासून मिळत आहे.मी स्वत:ला खुप भाग्यवान समजत असून ही संधी मला मिळवून देणाऱ्या पाटण तालुक्यातील तमाम जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो.कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी व व्यवस्थापन कोयना धरणाच्या संदर्भात २४ तास कार्यरत आहेत. तसेच कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीकाठच्या गांवामध्ये दक्षता घेण्याचे कार्य उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले हे अधिकारी व त्यांच्या देखरेखीखाली सर्वच तालुका प्रशासन कार्यरत आहे. असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.