धरण व्यवस्थापनाने पाणी सोडण्याची वेळ आली तर दिवसाचे सोडावे. रात्री धरणातील पाणी न सोडण्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अधिकाऱ्यांना आदेश.


धरण व्यवस्थापनाने पाणी सोडण्याची वेळ आली तर दिवसाचे सोडावे. रात्री धरणातील पाणी न सोडण्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अधिकाऱ्यांना आदेश.


 


पाटण / प्रतिनिधी 


आजमितीला कोयना धरणामध्ये ७७.१८ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यातच पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे तुर्तास तरी कोयना धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन नाही त्याचबरोबर कोयना धरणासह पाटण तालुक्यातील कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पातील पाणीसाठाही मुबलक झाला आहे.पाटण तालुक्यातील कोयना धरण असो वा मध्यम धरण प्रकल्पे असोत या धरण प्रकल्पातील पाणी सोडण्याची वेळ धरण व्यवस्थापनावर आली तर याची पुर्वकल्पना देवून धरण व्यवस्थापनाने धरणातील पाणी दिवसाचे सोडावे,रात्री नागरिक बेसावध असताना कोणत्याही धरणातील पाणी सोडू नये असे सक्त आदेश गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील सर्व धरण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना व प्रशासनाला दिले आहेत.  


            आज ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयामध्ये पाटण तालुक्यातील कोयना धरणासह कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पात झालेला पाणीसाठयासंदर्भात व पुढील करावयाच्या नियोजनाच्या अनुषंगाने बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बैठकीस प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,कोयनानगरचे सपोनी एम.एस.भावीकट्टी,कोयना धरण तसेच कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पाच्या व्यवस्थापनचे संबधित अधिकारी यांची उपस्थिती होती.


            याप्रसंगी प्रारंभी ना.शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या कोयना धरणात होणाऱ्या पाणीसाठयासंदर्भात व पुर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेनंतर पाणी विर्सगासंदर्भातील सविस्तर माहिती घेवून कोयना धरण व्यवस्थापनाने योग्य नियोजन करावे असे सांगत गतवर्षीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कोयना धरणातही पाणीसाठा मर्यादित झाला आहे.गतवर्षी आज तारखेला जेवढा पाणीसाठा हवा होता तो यावेळी नाही. आज धरणात ७७.१८ इतका पाणीसाठा आहे. महाबळेश्वर असो किंवा नवजा असो येथे मोठया प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे धरणात पाण्याची चांगली आवक होते. मात्र याचठिकाणी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. आजरोजी कोयना धरण परिसरातील नवजाला ७५ मिलीमीटर तर आजअखेर एकूण ३१२५ मिलीमीटर आणि महाबळेश्वरला ६६ मिलीमीटर तर आजअखेर एकूण ३०३८ मिलीमीटर इतकाच पाऊस झाला असल्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी प्रमाणात होत आहे.प्रतिवर्षी सरासरी १५ ऑगस्टपर्यंत कोयना धरणामध्ये पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होतो मात्र यावेळी १५ ऑगस्टला पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्याची शक्यता कमी आहे.मागील वर्षी सर्वत्रच पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कोयना धरणातून असो वा इतर मध्यम धरण प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या मोठया प्रमाणातील पाण्यामुळे आणि ओढयानाल्यानांही पावसाचे जादा पाणी आल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. सुर्दैवाने यंदा ही परिस्थिती नाही.


            आता पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे तालुक्यातील कोणत्याही धरणातून पाणी सोडण्याचे तुर्तास तरी नियोजन नाही तरीही कोयना धरणासह इतर मध्यम धरण प्रकल्पातील पाणी सोडण्याची वेळ धरण व्यवस्थापनावर आली तर पाणी सोडण्याची पुर्वकल्पना या धरणाच्या तसेच तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांना दयावी आणि धरणातील पाणी हे रात्रीचे न सोडता ते दिवसाचे सोडावे.रात्री नागरिक बेसावध असतात त्यामुळे पुढील नियोजन करताना अनेक अडचणी निर्माण होतात. दिवसाचे पाणी सोडले तर किती प्रमाणात पाणी नदीला येणार आहे याचा अंदाज येतो व दळणवळण असो किंवा नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भाने इतर उपाययोजना असोत यासंदर्भात प्रशासनालाही योग्य नियोजन करता येते असे ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत सांगितले.