स्वा. दादासाहेब उंडाळकर विद्यालयाचा कौतुकास्पद असा उपक्रम "अक्षरवारी ग्रंथालय आपल्या दारी "


पाटीलमळा(काले) येथे विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या अक्षरवारी ग्रंथालय आपल्या दारी पुस्तकाचे वितरण करताना शिक्षक धनंजय पवार, राजेंद्र गोरे, कणसे सर आदी (छायाचित्र जगन्नाथ माळी) 


उंडाळे प्रतिनिधी | जगन्नाथ माळी.


लाॅकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यानी घरातून बाहेर पडू नये. त्यांची वाचनाची सवय टिकून राहावी. वैचारिक बैठक भक्कम होण्याबरोबरच वाचनसंस्कृती समृद्ध व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय ग्रंथालयाची पुस्तके घरपोच उपलब्ध करून देणारा "अक्षरवारी ग्रंथालय आपल्या दारी" हा अभिनव उपक्रम येथील स्वा.दादासाहेब उंडाळकर माध्य. उच्च माध्यमिक विद्यालय, उंडाळे ता. कराड येथे राबवला जात आहे. उपक्रमाला विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याबाबत अधिक माहिती अशी : कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. सर्व विद्यार्थी घरीच आहेत गेल्या सुमारे चार महिन्यापासून ही परिस्थिती कायम आहे. विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत मात्र सर्व विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिक्षण घेणे शक्य नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीचे जतन व्हावे आणि शाळेत लागलेली वाचनाची सवय कायम रहावी, अवांतर वाचनाने त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंद व्हाव्यात या हेतूने येथील स्वा. दादासाहेब उंडाळकर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय ग्रंथालय विभागा च्या वतीने पुस्तके विद्यार्थ्यांना थेट घरी वाचनासाठी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. 


 यामध्ये शिक्षकांच्या मदतीने आठवड्यातून एकदा पुस्तकांचे संच ज्या गावात विद्यार्थी वास्तव्यास आहेत तेथे पोहच केली जातात. त्या गावातील एक विद्यार्थी अक्षर दूत म्हणून निवडला आहे. पुस्तके तिथेच ठेवून त्या गावातील विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके अक्षरदूता मार्फत वितरीत केली जातात विद्यार्थीही अक्षरदूता कडून पुस्तक घेऊन जातात. पुढील आठवड्यात हे संच बदलले जातात .अगदी वाडी-वस्ती पर्यंत या उपक्रमामुळे आमची अक्षरवारी व्दारे पुस्तके पोहोचली आहेत विद्यार्थ्यांबरोबरच पालक वाचण्यासाठी प्रवृत्त होऊ लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे घराबाहेर पडणे बंद झाल्याने प्रशासनालाही या उपक्रमाचा फायदा होताना दिसतो आहे .त्यामुळे ग्रंथालय विभागाने राबवलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याविषयी ग्रंथपाल सौ . अंजली देशमुख म्हणाल्या ग्रंथालयाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पीडीएफ पुस्तके, ऑडिओ कथा, कादंबरी, विविध भाषणे, मागणी नुसार ई -संदर्भही मोबाईल ग्रुप वर पाठवले जातात त्या बरोबर रोज एक बोधकथा व एक कविता असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यालयाचे प्राचार्य बी. पी. मिरजकर म्हणाले यामुळे सध्या सर्वाकडे भरपूर वेळ आहे मी आता काय करू? असा प्रश्न विद्यार्थी पालकांना वारंवार विचारत आहेत. त्यावर हे उपक्रम रामबाण उपाय ठरणार आहेत उपलब्ध वेळ पुस्तक वाचण्यासाठी दिल्यास विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी वाढून सर्वांगीण विकास होण्यासाठी या उपक्रमाची मोठी मदत होणार आहे.


 


📚 वाचनात रंगे


     पुस्तकांच्या संगे


     रहावे आनंदे


      बालक आपले


      घेऊन आली


      शाळा आपल्या दारी ...अक्षरवारी...