कराड दक्षिणमधील नागरी प्रश्नांचा डॉ. अतुल भोसले यांच्याकडून आढावा. 


कराड दक्षिणमधील नागरी प्रश्नांचा डॉ. अतुल भोसले यांच्याकडून आढावा. 


कराड / प्रतिनिधी 


    कराड तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्यासह अन्य प्रश्नांबाबत प्रशासनाकडून सुरू असलेल्या विविध प्रयत्नांचा आढावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी घेतला. नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही डॉ. भोसले यांनी यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. 


   डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आढावा बैठकीला कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला व कराड ग्रामीण विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ उपस्थित होते. 


   बैठकीच्या प्रारंभी डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमधील नागरी प्रश्नांचा आढावा घेतला. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासन कोणत्या उपाययाजना करत आहे, याबाबतची माहिती घेतली. यावेळी बोलताना प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदर अमरदीप वाकडे यांनी शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात असून, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती केली जात असल्याचे सांगितले. 


डॉ. अतुल भोसले म्हणाले, कोरोनाच्या लढाईत वैद्यकीय क्षेत्राबरोबरच प्रशासन आणि पोलिस यांचेही योगदान महत्वपूर्ण असून, त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे. अशा आपत्तीच्या काळात नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. कोरोनाची लागण झाल्यास नागरिकांनी खचून न जाता रूग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या या लढाईत कृष्णा हॉस्पिटल सर्वोतोपरी योगदान देत असून, नागरिकांनी येथील सुविधांचा लाभ घ्यावा. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, सर्वांना योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करण्याची गरज आहे. यावेळी शेती प्रश्नासंदर्भातही विस्ताराने चर्चा करण्यात आली. 


दरम्यान, प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी कृष्णा हॉस्पिटच्या कार्याचे कौतुक केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा हॉस्पिटल करत असलेले काम महत्वपूर्ण असून, येथील कामाबाबत सर्वस्तरातून कौतुक होत आहे, असे त्यांनी नमूद केले.