पाटण तालुक्यातील कोरोना बाधीत गावांना मंत्री देसाई यांच्या भेटी जनतेला दिला दिलासा तर प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना


पाटण तालुक्यातील कोरोना बाधीत गावांना मंत्री देसाई यांच्या भेटी जनतेला दिला दिलासा तर प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना


दौलतनगर दि.02 :- पाटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या पाटण तालुक्यातील कुसरुंड, बेलवडे,चोपडी आणि सांगवड या गावांना गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी शासकीय अधिकारी यांचे समवेत भेट देऊन आवश्यक त्या सुचना केल्या.


                             यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, संचालक बबनराव भिसे, विजयराव जंबुरे,उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


                       पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातील कुसरुंड, चोपडी, बेलवडे आणि सांगवड या गावांत कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर चारही गावे सील करून नाकाबंदी करण्यात आली होती. त्या गावांना गृह राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी भेट देवून योग्य त्या उपाय योजना करून सील केलेल्या परिसरात वैद्यकीय सुविधांसह जीवनावश्यक व अत्यावश्यक कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्या अशा सक्त सूचना केल्या.


                  पाटण तालुक्यात आज अखेर १०० पेक्षा ही जास्त कोरोना बाधित सापडले असल्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेले दोन महिने कसलाही कोरोनाचा संसर्ग तालुक्यात नव्हता.लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात बाहेरगांवाहून काही व्यक्ती तालुक्यात आल्यानंतर दोनचार दिवसापुर्वी कोरोनाचा चांगलाच प्रसार झाला असून कोरोना रुग्ण सापडलेल्या गांवाना भेटी देवून तेथील परिस्थितीची पहाणी करीत अधिकाऱ्यांना सतर्क ठेवण्याचे काम महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई करीत आहेत. त्यांनी आज तालुक्यातील कुसरूंड, बेलवडे, सांगवड आणि चोपडी येथे कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या गांवाना भेटी देवून प्रत्यक्ष फिल्डवर जावून येथील परिस्थितीची पहाणी केली व या गांवातील जनतेला दिलासा दिला देत प्रशासनाने अजुन सतर्क रहा अशा सुचना केल्या.


                 या भेटीमध्ये मंत्री देसाई यांनी बाधित गांवातील रुग्णांची विचारपुस करीत तालुका प्रशासनाच्या वतीने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना इन्स्टिटयुट कॉरन्टाईंन (विलगीकरण कक्ष) करण्यात आले आहे. आपणांस जीवनावश्यक वस्तू गावपोहोच करण्याच्या सुचना तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. तसेच गांवामध्ये ग्रामस्थांना २४ तास पाणी व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेशही संबधितांना देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्तही काही अडचण आली तर मला थेट फोन करा असेही त्यांनी प्रत्येक गांवातील नागरिकांना सांगितले.ज्या गांवामध्ये कोरेाना रुग्ण सापडले तेथे तालुका प्रशासनाने काय काय उपाययोजना केल्या आहेत याची प्रत्यक्ष पहाणी केली. गांवामध्ये नाकाबंदी केल्यानंतर बाहेरगांवचे कोण गांवात येत नाही ना ? याची तपासणी पोलिस विभागाने करावी. अशाही सुचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. 


दरम्यान मंत्री देसाई यांनी बाधित गावातील समस्यांचा आढावा घेतला. सर्व नागरिकांनी आपापली आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच घाबरून न जाता गर्दी न करता शासकीय नियमांचे योग्य पालन करावे आणि आपापल्या घरातच सुरक्षित राहावे असे आवाहन यावेळी त्यांनी नागरिकांना केले.


                    यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्य,महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी व कोरोना बाधित गावातील ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.