डॉ.अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे आंदोलन.दुध अनुदान वाढवून देण्याबाबत कराड प्रांताधिकारी यांना दिले निवेदन.


भाजपाचा 1 ऑगस्टला राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन करण्याचा इशारा


कराड : प्रतिनिधी -


कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दूधाच्या विक्रीमध्ये 30 टक्क्यांनी घट झाली आहे. अशा काळात खाजगी व सहकारी दूध संघाकडून अत्यल्प दराने दूध खरेदी केली जात असून, ज्यामुळे दूधाचा उत्पादन खर्चसुद्धा निघू शकत नाही. अशा स्थितीत दूध उत्पादकांना आधार देण्यासाठी गायीच्या दूधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान, दूध भुकटीसाठी प्रतिकिलो 50 रुपये अनुदान आणि शासनाकडून प्रतिलिटर 30 रुपये दराने दूधाची खरेदी करावी, या मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने 1 ऑगस्टला राज्यभरात दूध एल्गार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या मागण्यांचे निवेदन आज कराड येथे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना भाजपा कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मंडलाच्यावतीने  देण्यात आले.


या निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारल्या जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळाबाजार, कोकणातील शेतकऱ्यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा प्राप्त झालेला नाही. महाराष्ट्रात 1 कोटी 40 लाख लिटर गायीचे दूध उत्पादित होते. त्यापैकी ३५ लाख लिटर दूध सहकारी संघाकडून खरेदी केले जाते. तर 90 लाख लिटर दूध खाजगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. तसेच 15 लाख लिटर दूध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितात. शासकीय योजनेद्वारे फक्त 1 लाख लिटर दूध खरेदी केले जाते.


मात्र लॉकडाऊनच्या काळात दूधाच्या विक्रीमध्ये 30 टक्क्यांनी घट झाली आहे. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. तसेच सध्या ज्या दराने दूध खरेदी केले जाते, त्यातून दूधाचा उत्पादन खर्चसुद्धा निघू शकत नाही. शासनाने 10 लाख लिटर दूध 25 रु. प्रतिलिटर दराने खरेदी करण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षात केवळ 7 लाख लिटर दूधच खरेदी करण्यात आले आहे. त्यात पुन्हा मंत्र्यांचे लागेबांधे असलेल्या दूध संघाकडूनच शासन दूध विकत घेत आहे. इतर शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना मात्र शासनाने वाऱ्यावर सोडले आहे.


म्हणूनच गायीच्या दूधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान, दूध भुकटीसाठी प्रतिकिलो 50 रुपये अनुदान आणि शासनाकडून प्रतिलिटर 30 रुपये दराने दूधाची खरेदी करावी, अशी मागणी भाजपाच्यावतीने या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास भाजपा, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाइं महायुतीच्यावतीने 1 ऑगस्टला राज्यभरात दूध एल्गार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कराड दक्षिणचे अध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, उत्तरचे अध्यक्ष महेश जाधव, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, संजय पवार, महेंद्र डुबल, ॲड. विजय पाटील, सुनील शिंदे, धनाजी माने, विश्वास सावंत, भरत देसाई, शंकर पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थि त होते.