कराडच्या नगराध्यक्षा पॉझिटिव्ह , कृष्णा रूग्णालयात उपचारार्थ दाखल
प्रतिनिधी / कराड
कराडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रोहिणी शिंदे या कोरोना महामारीच्या काळात शहरवासियांना दिलासा देण्यासाठी सतत ऑन फिल्ड होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. लक्षणे दिसल्याने बुधवारी त्यांचा स्वॅब कृष्णा रूग्णालयात देण्यात आला. सायंकाळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नगराध्यक्षाच बाधित आल्याने त्या लवकरात लवकर बर्या व्हाव्यात, अशी मनोकामना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नगराध्यक्षा या नात्याने रोहिणी शिंदे या शहरात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सतत कार्यरत होत्या. 22 मार्चला लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर त्यांनी पालिकेच्या सार्वजनिक सुविधा तत्परतेने देण्यासाठी सतत प्रयत्न केले. नगरपालिकेच्या कोविडच्या अनुषंगाने होणार्या बैठका, कंटेनमेंट झोनला भेटी , बाधित झालेल्या रूग्णांच्या घरी भेटी, शासकीय बैठका, मदतकार्य याशिवाय नगरपालिकेत उपस्थिती त्यांनी लावली होती. नगरपालिकेच्या सभा, कार्यक्रमात ही त्यांची उपस्थिती होती.
मध्यंतरी शहरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी नगराध्यक्षा फायर फायटर गाडीबरोबर संपूर्ण शहरात फिरल्या होत्या. त्यावेळच्या दगदगीनेही त्यांची प्रकृती बिघडली होती.
गेल्या दोन दिवसांपासून ताप आल्याने नगराध्यक्षांनी कृष्णा रूग्णालयात स्वॅब टेस्ट केली. सायंकाळी त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, रिपोर्ट बाधित आल्याने शहरात खळबळ उडाली. नगराध्यक्षांचे निवासस्थान असणार्या जय भारत कॉलनीत आरोग्य विभागाने सॅनिटायझेशन केले आहे. दरम्यान, नगराध्यक्षांच्या संपर्कात असलेले पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक यांना क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.
सायंकाळी नगराध्यक्षांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करत माझा कोविड 19 चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे सांगितले आहे .
माझी प्रकृती स्थिर आहे स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या लवकरच ठीक होऊन मी तुमच्या सेवेत हजर राहिन असे भावनिक आवाहन नगराध्यक्षा शिंदे यांनी कराडकर जनतेला केले आहे.