दवाखान्यात घुसून डॉक्टरांना मारहाण... ‼️


काळगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना मारहाण


काळगांव/वार्ताहर


पाटण तालुक्यातील भरेवाडी (काळगांव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मंगेश आत्माराम खबाले (वय 39) यांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित सहा जणांच्या विरुध्दात ढेबेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. घडलेली


घटना अतिशय निंदनीय असून परिसरातून या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे.


याप्रकरणी ढेबेवाडी पोलसांनी दिलेली माहिती अशी की, (मंगळवार दि.7 जुलै) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास काळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घुसून तेथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.मंगेश आत्माराम खबाले यांना सहा जणांनी मारहाण केल्याची घटना घडली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी येथील आनंदा शंकर सावंत तसेच अनोळखी चार पुरूष व महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीतील माहितीनुसार डाॅ.खबाले दहा महिन्यांपासून काळगाव केंद्रात कार्यरत आहेत. रविवारी (5 जुलै रोजी) सावंतवाडीतील नामदेव शंकर सावंत (वय 70) हे छातीत दुखत असल्याने उपचारासाठी केंद्रात आले होते. त्या वेळी डाॅ.खबाले जवळच्या वाझोली गावात कोरोना बाधित रूग्ण सापडल्याने तिकडे गेले होते. कर्मचाऱ्यांनी त्यांना कळविल्यानंतर ते केंद्रात परत आले. सावंतवाडी परिसर प्रतिबंध क्षेत्रात आहे. श्री. सावंत यांच्यासोबत कुणी नसल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना दवाखान्यात बोलावून पुढील उपचारासाठी रूग्णवाहिकेतून कराडच्या कृष्णा हाॅस्पिटलात पाठवले. मात्र दरम्यानच्या काळात श्री सावंत यांचा मृत्यू झाला.


(मंगळवार दि.7 जुलै) रोजी दुपारी त्यांच्या नातेवाईकांनी काळगावच्या आरोग्य केंद्रात जावून डाॅ.खबाले यांना त्याबाबत जाब विचारत मारहाण केली. रूग्णासोबत दिलेल्या कागदपत्रावर कोविडचा उल्लेख केल्याने त्यांना कोणत्याही रूग्णालयात घेतले नाही. तुमच्यामुळेच रूग्ण गेला असे मारहाण करणार्‍यांचे म्हणणे होते. मारहाण करताना त्यांनी लोखंडी स्टुल फेकल्याने टेबलावरील काच फुटून नुकसान झाली आहे. तसेच डाॅक्टरांच्या उजव्या हाताला दुखापतही झाली आहे. रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संबधित मारहाण करणार्‍यांना दवाखान्याबाहेर काढले. त्यानंतर डाॅ.खबाले यांच्यावर येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक अषोकराव थोरात यांनी भेट देवून तपासकामी सुचना दिल्या. सहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तमराव भजनावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या.


या प्राथमिक आरोग्य केंद्रात काळगाव विभागातील सर्व वाडया वस्त्यामधील लोक येतात. याशिवाय धामणी, वाझोली अगदी कुठरेपासून सर्व रुग्ण येथे येतात. हा खूप मोठा परिसर आहे.


कोरोनाच्या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र भरेवाडीने ओपीडी च्या माध्यमातून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. मार्च महिन्यात 2,355, एप्रिल महिन्यात 2,112, मे महिन्यात 1,663,  जून महिन्यात 2,317 तर 7 जुलै अखेर 315 असे एकूण 8,762 रुग्णांना सेवा दिली आहे. असे काम असतानादेखील झालेल्या घटनेमुळे कर्मचारी वर्ग नाराज झाला आहे.


कोरोना मुळे 22 मार्च पासून सर्वत्र लाॅकडाऊन करण्यात आले. यावेळी मुंबई, पुणे व अन्य ठिकाणाहून गावी अनेक लोक आले आहेत. अशा सुमारे 11,085 प्रवाशांच्या तपासणी दवाखान्याच्या मार्फत करण्यात आली आहे. तसेच त्यानंतर इतर ठिकाणी जाण्यासाठी सुमारे 400 लोकांना ई-पास देण्यात आले आहेत.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


काळगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅक्टर व वैद्यकीय सेवेतील कोणत्याही व्यक्तीस जर अशाप्रकारे कोणी त्रास दिला तर आणि कायदा सुव्यवस्था भंग केल्यास त्याचेवर कायदेशीर कारवाई केली जाईल.


- नितीन पाटील, पोलीस पाटील, काळगांव


 


काळगांव मध्ये 2 खाजगी दवाखाने आहेत. त्यामुळे दवाखान्यात जाण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र भरेवाडी येथेच जावे लागते. कोरोना कालावधीत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांनी चांगली सेवा दिली आहे. त्यांच्यावर झालेला हल्ला हा निंदनीय अशा स्वरुपाचा आहे.


-एक नागरिक, काळगांव


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज