प्रशासनाच्या नियमांचे पालन केले तरच अनलॉकचे यश मिळेल - पृथ्वीराज चव्हाण


प्रशासनाच्या नियमांचे पालन केले तरच अनलॉकचे यश मिळेल - पृथ्वीराज चव्हाण


कराड, ३१ जुलै २०२०: केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन मध्ये शिथिलता केली आहे त्याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात सुद्धा १ ऑगस्ट पासून नवीन आदेशाची अंमलबजावणी होत आहे. पण याचा अर्थ सर्व काही सुरळीत झाले असा अर्थ न काढता जनतेने प्रशासनाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन केले तरच अनलॉकचे यश मिळेल असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. 


काही दिवसापूर्वी कराड मध्ये लॉकडाऊनच्या संदर्भात व्यापारी असोसिएशन व प्रमुख व्यापारी यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चा केली होती. त्या चर्चेत सर्व व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी होती कि, दुकाने उघडण्याची वेळ वाढवून किमान ८ तास असावी. त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी जनतेची व व्यापाऱ्यांची गैरसोय दूर व्हावी या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानुसार सातारा जिल्हा अनलॉक च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काल आदेश काढत व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची मुभा सकाळी ९ ते रात्री ७ अशी करण्यात आली आहे. 


याबाबत माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, व्यापाऱ्यांच्या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी हि दुकाने उघडण्याची वेळ वाढवण्याबाबतीत होती तसेच यासंदर्भात जनतेशीसुद्धा मी चर्चा केल्यानंतर त्यांच्या सुद्धा मागणीत एकवाक्यता होती कि सर्व व्यवहार दैनंदिन पद्धतीने लवकरात लवकर सुरळीत सुरु व्हावेत. याच अनुषंगाने जनतेच्या व व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यात लॉकडाऊन बाबत शिथिलता आणली आहे. तरी हि शिथिलता जनतेच्या व व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आली आहे याची जाणीव जनतेने व व्यापाऱ्यांनी ठेवून मार्केटमध्ये वावरताना व दुकानांमध्ये ठराविक अंतराचे पालन करावे तसेच मास्कचा वापर आवर्जून करावा. कोरोनाचे संकट टळले नसून ते अधिक गडद होत चालले आहे यासाठी सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले तरच सातारा अनलॉक ला यश मिळेल.  


माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाऊन सुरु झालेपासून जनतेसोबत कायम संवाद ठेवला आहे. या संवादामधूनच जिल्ह्यात लॉकडाऊन दरम्यान जनतेच्या समस्या सोडविल्या गेल्या. आ पृथ्वीराज बाबांनी कराड दक्षिण मतदारसंघातील जनतेशी संवाद ठेवल्याने लॉकडाऊन मध्ये वेळोवेळी शिथिलता आणली गेली आहे. ती शिथिलता जनतेला दिलासा देणारी ठरलेली दिसते.