हॅलो, मी शाळा बोलतेय...!

 


हॅलो, मी शाळा बोलतेय...!


होय, मी शाळा बोलतेय...! हे ऐकून आपण दचकाल. पण मलाही भावना आहेत. देशात 23 मार्च, रोजी संपूर्ण  देशात लाॅकडाऊन झाला आणि सर्वच गोष्टी जागच्या जागी थबकल्या. माझ्या काळजात पण धस्स् झाले. माझ्या 10 वी च्या लेकरांचा एक पेपर आतापर्यंत झाला नाही म्हणून माझा जीव थार्‍यावर नाही राहिला. संपूर्ण जगावर कोरोना नावाच्या महामारीचे संकट उभे ठाकले आणि मी 23 तारखेपासून वनवासात असल्यासारखीच आहे. भयाण शांतता जीव खायला उठत आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोन्टाईन केलेले काही लोक होते त्यामुळे थोडेसे हायसे वाटले. तशी मला एकटे राहण्याची अजिबात सवय नाही. मार्च, एप्रिल, मे महिन्यात मुलांच्या परीक्षा झाल्या की मुलांची गर्दी हळू हळू कमी व्हायची. त्यावेळी मी बैचेन व्हायची. मला कायम मुले आणि शिक्षक यांच्यात राहण्याची सवय मुलांना समजू लागल्यापासून ते काॅलेजमध्ये जाईपर्यंत ती माझ्याच सहवासात असायची. त्यांच्या अडीअडचणी, दुःखे, आनंद सर्व गोष्टी मला समजायच्या. दिवाळीच्या सुट्टीत किंवा उन्हाळयाच्या सुट्टी मुले येत नसायची तर मला अजिबात करमत नसे.


कित्येक मुलांनी घरच्या अडचणीमुळे माझ्यापासून नाईलाजाने दुरावत नोकरी काम धंदा करण्यास सुरुवात केली. कित्येक त्यातून शिकत मोठया पदावर गेली. अनेकजण काळया मातीची सेवा करण्यात रमले. किती किती म्हणून सांगू.....पण इतक असून पण पुण्या मुंबईला गेलेल्या मुलांनी मला कधी अंतर दिलं नाही. माझ्या मुलांनी मला हवे ते दिले. आपल्या भावंडांच्या शिक्षणात अडचणी येवू नये यासाठी सर्व सुविधा देत राहिल्या याचा मला कायमच अभिमान वाटत आहे.


मार्च एप्रिल मध्ये परीक्षा झाल्यावर 1 मे पर्यंत सर्व मुले निकालाची वाट बघत बसायची. या दिवशी सर्वजण यायची. अनेकांच्या पोटात भितीचा गोळा यायचा. कित्येकांच्या डोळयात अगोदरच गंगा जमूना यायच्या आलेल्या मी पाहिल्या आहेत. 1 मे ला आल्यानंतर सर्वांच्या साक्षीने ध्वजारोहन होवून मग मुलांना निकाल देण्यात यायचा. या सर्वांची साक्षीदार मी आहे. मे नंतर मग जून महिना कधी उजाडतोय याची चातकाप्रमाणे मी वाट बघत बसायची. मे महिन्याचे दिवस मला वर्षानुवर्ष गेेल्यासारखे वाटायचे. 15 जूनपर्यंत पुन्हा वाट पाहत बसायची. काही जण न कुरकुरता आनंदात यायची. परंतू काहींना मात्र मी आवडत नसायची. लहान बालकांची खूप मजा यायची. त्यांना घरातून माझ्याकडे आणताना प्रसाद द्यावा लागे. बिचारी चिमुरडी मुले मोठमोठयाने रडायची त्यावेळी माझ्या हृदयात कालवाकालव व्हायची. नंतर मात्र माझी सवय लागल्यानंतर त्यांना माझ्याशिवाय करमत नसे. जून महिना सर्व मुले, पालक, शिक्षक या सर्वांच्या गडबडीचा असायचा.


शाळा सुरु होताना घंटा, तासांची घंटा, मधली सुट्टी जेवणाची सुट्टी शाळा सुटतानाची घंटा, मुलांच्या सुंदर आवाजातील प्रार्थना, राष्टगीत हे ऐकून अंगावर रोमांच यायचे. हे सर्व डोळयासमोर जसंच्या तसं दिसत आहे.


कित्येक वर्षापासून हे सर्व मी माझया डोळयात साठवले आहे. परंतू यंदा मात्र या सर्वांना कोरोनाची नजर लागली आणि माझं हे सुख माझ्याकडून हिरावून घेतलं. अजूनतरी हे माझ्या नशिबात नाही हे मला वाटते. अजूनपण मुलांच्या खेळण्याचा, बागडण्याचा, शिकण्याचा आवाज माझ्या कानात घुमतो आहे. मला भेटता येत नाही त्यामुळे अनेक मुलांचे चेहरे पडले आहेत.


सध्या शिक्षक काही कामासाठी माझ्याकडे येत आहेत. त्यामुळे थोडे हायसे वाटत आहे. मी अनेक पिढ्या घडताना पाहिल्या आहेत. अनेक उन पावसाळे अनुभवले आहेत. पण अशी परिस्थिती पहिल्यांदाच अनुभवते आहे.


परमेश्वराने हे दिवस लवकरात लवकर घालवून माझी आणि मुलांची, शिक्षकांची, पालकांची ताटातूट लवकर थांबवावी ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना..!


 


शब्दांकन: डाॅ.संदीप डाकवे,


मो .9764061633