कोरोना चाचणी सेंटरमुळे रुग्णांवरील उपचाराला गती मिळेल  आ. शिवेंद्रसिंहराजे; जिल्हावासियांच्या वतीने ना. अजित पवारांचे मानले आभार  


कोरोना चाचणी सेंटरमुळे रुग्णांवरील उपचाराला गती मिळेल 


आ. शिवेंद्रसिंहराजे; जिल्हावासियांच्या वतीने ना. अजित पवारांचे मानले आभार  


सातारा: कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सातारा जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. कोव्हीड-१९ (कोरोना) चाचणी करण्यासाठी सातारा आरोग्य विभागाला पुण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी सेंटर तातडीने सुरु करावे, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. ना. पवार यांनी १० दिवसातच हा प्रश्न मार्गी लावून जिल्ह्याची मोठी गैरसोय दूर केली आहे. कोरोना चाचणी सेंटरमुळे रुग्णांवरील उपचाराला गती मिळेल असे स्पष्ट करतानाच आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांचे आभार मानले आहेत. 


दि. २७ जून रोजी ना. अजित पवार हे सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्राम गृहात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली होती. त्यावेळी सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी सेंटर आवश्यक असून ते सुरु करावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली होती. तशा आशयाचे निवेदनही त्यांनी ना. पवार यांना दिले होते. पुणे आणि मुंबईवरुन असंख्य लोक सातारा जिल्ह्यात त्यांच्या मूळ गावी परतले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदविस वाढतच आहे. सातारा शहरातही रुग्ण आढळून येत असून कोरोना चाचणीसाठी रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने पुण्याला पाठवले जातात. रुग्ण बाधित आहे का अबाधित याचा अहवाल पुण्यावरून यायला दोन ते तीन दिवस लागतात. त्यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार सुरु होण्यासाठी आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्षम आणि प्रभावीपणे काम करण्यासाठी साताऱ्यातच कोरोना चाचणी सेंटर असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी सेंटर तातडीने सुरु करावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली होती. त्यावेळीच ना. पवार यांनी याबाबत त्वरित निर्णय घेऊ असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे याना दिला होता आणि दहा दिवसातच ना. पवार यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरून कोरोना चाचणी सेंटरला मंजुरी दिली. 


ना. पवार यांच्या सूचनेनुसार राज्य शासनाने साताऱ्यात क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा (आरटी पीसीआर लॅब) उभारण्याचा निर्णय पारित केला आहे. राज्य शासनाकडून तातडीची बाब म्हणून साताऱ्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यास मंजूरी देवून यासाठी आवश्यक असलेल्या 75 लाख 46 हजार 186 इतका निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी/ जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करण्यास मंजूरी दिली आहे. या प्रयोगशाळेसाठी लागणारी यंत्रसामग्री ईटेंडर ऐवजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर यांच्याकडील 18 एप्रिलच्या पुरवठा आदेशानुसार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच लागणारे आवश्यक ते तांत्रिक मनुष्यबळ व त्यावरील खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत उपलब्ध निधीतून करण्यासही मान्यता दिली आहे.


जिल्ह्यात येणारी बहुतांश कुटुंबे ही कंटेनमेंट, हॉटस्पॉट व रेड झोनमधील असल्याने या सर्व नागरिकांत लक्षणे दिसत असल्यास कोरोना तपासणी करणे अनिवार्य ठरत आहे. तपासणीसाठी व अहवाल प्राप्तीसाठी लागणारा कालावधी बघता प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत होता. मोठ्या प्रमाणावर खर्चही होत आहे. ही परिस्थिती पाहता जिल्हा रुग्णालयात आरटी पीसीआर लॅब सुरू करावी अशी मागणी केली होती. त्यास मान्यता मिळाल्याने आरोग्य यंत्रणा आणि रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हावासियांच्या वतीने ना. पवार यांचे आभार मानले आहेत.