"स्मगलर एक वल्ली"(भाग४)


"स्मगलर एक वल्ली"(भाग४)


         "स्मगलर"म्हणजे अतरंगी वल्ली होती...हो होतीच....कारण...त्याच एकंदरीत वागणं-बोलण नि जगणं अजबगजबच होत..!!कल्पना करण्यापलीकडचं!!कॉलनी सोडून आता २०वर्षांचा काळ लोटला,कॉलनी सोडून आल्यानंतर २,३वर्षांतच तो मरण पावला.अशी माहिती तेव्हा कळाली होती.खूपच वाईट वाटलं होतं तेव्हा मला...!!


         "स्मगलर"म्हणजे कोणी सराईत चोर नव्हता की परंपरागत वारसा असलेला अट्टल दरोडेखोर, चोरटा सुद्धा नव्हता. छोट्या -मोठ्या वस्तू चोरी करून विकणे नि आपले छोटे शौक भागविणे एवढाच छोटासा हेतू त्यामागे होता.२००८साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट"दे धक्का!"तुम्ही सर्वांनीच पाहिला असेल....त्यातील सिद्धार्थ जाधव ने "धनाजी"ही व्यक्तीरेखा रंगवलेली आहे.हा"धनाजी"क्लीप्टोमॅनिया"(kleptomania)ह्या मानसिक आजाराने त्रस्त असतो.हाताला लागेल,सापडेल ती वस्तू चोरी करणे ही सवय त्याला असते.नि कितीही रागावले,मारले तरीही अनावधानाने म्हणा किंवा अस्वस्थता निर्माण करणारी सवय म्हणा,चोरी केल्या शिवाय त्या" धनाजी"ला जसे चैन पडत नसे तसेच ह्या "स्मगलर"ची कहाणी होती.त्याला देखील चोरी करण्याचा अजब छंदच जडला होता.त्याला कितीही समजावले,दटावले तरीही त्याची ही अजब तऱ्हा नि सवय काही जात नव्हती की तो मरेपर्यंत गेलीही नाही...!!


              "स्मगलर"एका संपन्न घरातील होता,उंचपुरे व्यक्तिमत्व लाभलेला नि त्याच्या घरच्या सुबत्तेमुळे त्याला कशाचीही मुळातच ददात नव्हती.त्याची पत्नी देखील अतिशय सुंदर,रूपवान होती.स्मगलर ला दोन मुलगे होते म्हणजे अजूनही आहेत ते.तेही दोघे उच्चशिक्षित, सरकारी नोकरी करणारे. सगळं वैभव,गृहस्थी,शेतीवाडी, मुलं, घर-संसार असतानाही....स्मगलर" क्लीप्टोमॅनिया"ने घेरला होता,त्या मानसिक रोग म्हणवणाऱ्या सवयीने त्याला "चोर"बनवल होत.कुठे शेतातून काही भाज्या-फळ वारंवार गायब होऊ लागली तशी त्या शेतमालकांनी पाळत ठेऊन "स्मगलर"चा शोध लावला होता.


                त्याच्या घरच्यांनी तर त्याच्या ह्या चोरीच्या उद्योगाला नि वारंवार येणाऱ्या तक्रारी, भांडणे यामुळे वैतागून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे,त्याचा नि आमचा काही एक संबंध नाही असे म्हणून तो नि तुम्ही काहीही करा तिकडे असेच उत्तर देऊन घरचे त्याच्याकडे संपूर्णतः दुर्लक्ष करत असत.पण,स्मगलरच्या ह्या चोरीच्या सवयीचा व त्याच्या नावाच्या गवगव्याचा इतर अनेक भुरट्या चोरांनी व पांढरपेशा, सज्जन,सरळमार्गी म्हणवणाऱ्या लोकांनी खूप फायदा उचलून अनेकांच्या शेतातील भाजी-फळे इतर वस्तू यांवर डल्ला मारून त्याला अधिकच बदनाम करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले होते.हेही तितकेच वाईट होते.


                तरीही "स्मगलर"त्याच्याच जगात वावरत राहिला,जगत राहिला...त्याला कसलीच पर्वा नव्हती की,कोणी त्याला काय म्हणत असेल,त्याच्या नावाचा गैरवापर करून स्वतः चोरी करत असेल ह्याच त्याला काहीच देणंघेणं नव्हतं हेही अजबच होत की...!!


               राहता राहिला प्रश्न असा की,आमचे आई-पपा नि समस्त कॉलनीतील रहिवासी त्याच्या चोरीच्या मालाची तो चोरीचा असूनही खरेदी का करत असत ह्याचा?तर,ह्या स्मगलरच्या घरच्यांनी त्याच्या ह्या चोरीच्या प्रकारांनी वैतागून त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं होतं.त्यामुळे त्याला जगायला काहीच साधन उरलं नव्हते. त्यामुळे बघितलं तर जास्तीत जास्त५-१०रुपयांचा माल तो विकत असे नि जो आम्ही राहत असलेल्या संपन्न,शेतीप्रधान गावातील कोणत्याही शेतमालकासाठी अत्यंत क्षुल्लक बाब होती.नि ह्या चोरीच्या पैशातून तो काही मोठ्या प्रमाणावर संपत्ती संचय देखील करणार नव्हता की करत नव्हता...!!त्यातच त्याची अजब खोड होती की,त्याचा माल विकल्याशिवाय तो एखाद्या घरातून अजिबात हलतच नसे...किंवा एकसारखे घ्या की मावशी,घ्या की भाऊ असे टूमणे लावत असे.त्याच्या ह्या चमत्कारिक लाळघोटेपणा की निर्विकार झोण्डपणाला वैतागून,कधी-कधी त्याच्या एकाकी जगण्याची दया येऊन सर्वजण त्याचा माल खरेदी करत असत...!!अनेक वर्ष मी हे त्याचं "जगणं"नि"वागणं"पाहिलं होतं.तेव्हा एव्हढं काही समजत नव्हते. पण बालवयात "स्मगलर"माझ्यावर त्याची छाप सोडून गेला.एक माणूस म्हणून ...!!


           दहा वर्षांच्या कालखंडानंतर पपांची बदली दुसऱ्या गावी झाली,त्याआधीच कॉलनीतील बरीच कुटुंब विस्थापित झाली होती.आम्ही कॉलनी सोडली तेव्हा पूर्णच ऑफिस विस्थापित झाल्याने तिथे कोणीच राहणार नव्हते.आमच्या नंतर इतर राहीलेली कुटुंब महिनाभराच्या कालावधीत विस्थापित झाली.प्रत्येकाने त्या कॉलनीत जगलेले सुखद क्षण आठवून हुंदके देत त्या जागेचा घेतलेला निरोप अजूनही मला लक्षात आहे.त्यावेळीही मला आता "स्मगलर"चे काय होईल?हा बालमनाला पडलेला प्रश्न मी पपांना विचारला होता. तेव्हा त्यांनी काहीच उत्तर न देता मला उचलून सामानाच्या टेम्पोत बसवलं होत....झरझर वेगात टेम्पो दुसऱ्या गावी घेऊन जात होता....खूप आठवणी ठेऊन!!


      यथावकाश सारे आपापल्या आयुष्यात पुढे गेले .शाळा,कॉलेज, नोकरी संसार यात सगळे रमून गेले.जुना गाव आणि "स्मगलर"इतिहासजमा झाल्यासारखे झाले. पहिले२,३वर्ष,कॉलनीतील दत्त मंदिरा मुळे दत्तजयंती च्या निमित्ताने जाणे व्हायचे.कोणीच राहत नसल्याने व कोणाचेच नियंत्रण, लक्ष नसल्याने आणि असले तरी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कॉलनीतील जिनसा विकण्याचा धडाका लावल्याने अनेक चोर,भंगार विक्रेते यांनी त्या कॉलनीला भयावह पडक्या वसाहतीत रूपांतरीत करुन टाकले होते.त्यामुळे तिथे जाणे फारच जीवावर येऊ लागले होते. संपन्नता ,सुख,आनंद,हसणं-बागडण अनुभवलेली ती जागा अशी भयावह रूपांतरित होताना पाहून एकंदरीत काळीज पिळवटून जायचं त्यामुळे अलीकडच्या काळात तिकडे जाणच टाळलं...!!


           एकदा असेच गेलो असताना तिथल्या एका काकांना मी #"स्मगलर"विषयी विचारलंच....!!कुठे आहे तो आता??त्यांनी सांगितले,"तुम्ही कॉलनी सोडून गेल्यानंतर१,२वर्ष होता तो,तुम्ही सगळे गिऱ्हाईक होता त्याचे,ते तुटले मग तो रेल्वे स्टेशन वर जाऊन काही-बाही विकायचा...!!त्यातून मग त्याच खाण-दारु अस भागवायचा.....एक दिवस गेला तो....असाच अचानकपणे...!!त्याला घरी बघत नव्हते नि हा सुधारत नव्हता मग काय होणार?"......मला मात्र तेव्हाही कसनुस झाले होते ते ऐकून..!!मी चोरी करणाऱ्या व्यक्तीच अजिबात समर्थन करत नाही. पण,काही व्यक्ती अशा असतात की त्या कितीही अजबगजब, चमत्कारिक असल्यातरी उगाचच त्यांच्याविषयी एक आपुलकी आपल्या मनात निर्माण होतेच..!!अन अशा व्यक्ती बालपणी भेटलेल्या असल्या की त्या बालवयातील "निरागस"भावविश्वात त्या अधिकच घट्टपणे त्यांच्या अस्तित्वाचे मूळ धरून राहतात हेही तितकेच खरे...!!


         "स्मगलर"...एकमेवाद्वितीय.... आजूबाजूला अनेक स्मगलर फिरत आहेतच की आपल्या.... वरवर खरेपणाचा,नीतिमत्तेचा बुरखा पांघरूण असलेले......अनेकदा मोठमोठाले घोटाळे,काळाबाजार करणारे त्यासाठी मग साम-दाम-दंड-भेद ह्याचाही बेमालूमपणे वापर करणारे.....!!मग ते अन त्यांचं वागणं आपल्याला रुचतच की....नाही आपण सहजपणे चालवून घेतो,त्यांच्या" त्या"वाईट वागण्याला दुर्लक्षित करून त्यांना" मोठा माणूस",भाग्यविधाते, समाजभूषण म्हणतो की...!!मग अशावेळी आमचा हा "स्मगलर"मला तरी त्यांच्यापेक्षा कैक पटीने चांगला वाटतो....!!त्याच्या गुणदोषांसकट....!!


        मग तुम्हाला काय वाटतं??


 


(समाप्त)......!!


 


-शुभांगी पवार (कंदी पेढा)


(#फोटो:-साभार:"shutterstock")