सकाळी १० पासून रात्री १० पर्यंत गृहराज्यमंत्री जनतेसाठी फिल्डवर.


गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी एका दिवसात पाहिली पाच तालुक्यांची कायदा,सुव्यवस्था. सकाळी १० पासून रात्री १० पर्यंत गृहराज्यमंत्री जनतेसाठी फिल्डवर.


सातारा दि.22: राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी काल एका दिवसात सातारा जिल्हयातील वाई ,खंडाळा, फलटण, माण,खटाव या पाच तालुक्यांचा दौरा करीत या पाच तालुक्यात कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळातील कायदा व सुव्यवस्थेची सविस्तर पहाणी करीत या पाच तालुक्यातील सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठकाही घेतल्या. सकाळी १० वाजलेपासून रात्री १० वाजेपर्यंत गृहराज्यमंत्री ना.देसाई हे प्रत्यक्ष फिल्डवर होते. दिवसभराच्या या दौऱ्यात त्यांनी पाचही तालुक्यातील कन्टेंमेंट झोनची तसेच महसूल व पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची पहाणी केली. गृहराज्यमंत्र्यांच्या दौऱ्यात गृह विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसह तालुकास्तरीय सर्व विभागाचे शासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.


          गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केवळ मतदारसंघातच राहून कोरोनाच्या संकटामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना केला नाही तर त्यांनी सातारा जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये जावून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर विविध तालुक्यामध्ये प्रशासनामार्फत काय काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत ? कोणत्या गोष्टींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही समस्या निर्माण होवू नयेत याकरीता दौरे करुन बैठका घेवून बारकाईने लक्ष दिले. दोनच दिवसापुर्वी त्यांनी व जिल्हयाचे पालकमंत्री यांनी कराड शहरातील तसेच आसपासच्या गावातील कन्टेंमेंट झोनची,नाकाबंदीच्या ठिकाणांची संयुक्त पहाणी केली होती. गृहराज्यमंत्री ना.देसाई यांनी पाटणसह कराडपुर्वी कोरेगांव, महाबळेश्वर तालुक्यांमध्ये जावून कोरोनाच्या संदर्भात गृह तसेच महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत.काल त्यांनी उर्वरीत राहिलेल्या वाई,खंडाळा, फलटण, माण,खटाव या पाच तालुक्यांमध्ये दौरा करुन त्यांचेकडील गृह विभागाच्या कायदा व सुव्यवस्थेबरोबर आरोग्य, महसूल विभागातील सर्व अधिकारी वर्गाने सतर्क करण्याचे काम केले.


            ना.शंभूराज देसाईंनी वाई, खंडाळा, फलटण,माण,खटाव या पाच तालुक्यांचा दौरा करताना त्यांचा सकाळी १० वा. सुरु झालेला दौरा रात्री १० पर्यंत सुरु होता.वाई व खंडाळा मतदारसंघाचे आमदार मकरंदआबा पाटील यांच्यासमवेत त्यांनी वाई,खंडाळा,लोणंद येथील कन्टेंमेंट झोनची व नाकाबंदीच्या ठिकाणांची पहाणी केली तसेच याठिकाणी असणाऱ्या समस्या त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. जागेवर सुटणाऱ्या समस्या त्यांनी तात्काळ जागेवरच सोडवून दिल्या.शासनामार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कोणते निर्णय करुन घेणे अपेक्षित आहेत, जिल्हास्तरावरुन कोणते निर्णय या तालुक्यातील समस्यांवर करुन घ्यावयाचे आहेत यासंदर्भात शासकीय सर्व अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली व समोर आलेल्या समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासित केले.


            तसेच फलटण तालुक्यात या मतदारसंघाचे आमदार दिपक चव्हाण यांचेसमवेत फलटणमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेतली इथल्याही समस्या जाणून घेवून कोरोना काळात कोणत्या गोष्टींची आवश्यकता भासल्यास राज्यांचा गृहराज्यमंत्री म्हणून मला कधीही सांगा त्या समस्या सोडविण्यासाठी आपण कठीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर त्यांनी माण तालुक्यातील दहिवडी व वडूज येथील शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून गृहविभागा मार्फत कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता केलेल्या उपाययोजनांची पहाणी केली.


          ना.शंभूराज देसाईंनी मंगळवारी वाई, फलटण, लोणंद,दहिवडी आणि वडूज येथे भेट दिल्यानंतर येथील परिसराची पाहणी करण्याबरोबर कोरोना बाधित रुग्णांचा प्राधान्याने आढावा घेतला. प्रत्येक तालुक्यातील पोलीस, महसूल विभाग व वैद्यकीय प्रशासन हे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर चांगले काम करीत असल्याचे सांगत अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली.गृहविभागाच्या तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात काही ठिकाणी मांडण्यात आलेल्या समस्यांवर त्यांनी कडक भूमिका घेत सुधारणा करा असे जागेवरच आदेश दिले.कोरोनाच्या संकटात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी या पाच तालुक्यामध्ये दिलेल्या सदिच्छा भेटी तसेच येथील परिसराची पहाणी करण्याबरोबर जनतेच्या समस्या जाणून घेत त्यावर स्थानिक सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना सांगून केलेल्या उपाययोजना यामुळे काल या पाचही तालुक्यातील जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.तसेच कोरोनाच्या संकटात शासकीय अधिकारी जसे दररोज फिल्डवर काम करीत आहेत तसेच काम राज्याचे गृहराज्यमंत्री हे दररोज फिल्डवर आहेत हे पाहून त्यांच्या या कामांचे अनेक ठिकाणी जनतेने स्वागत करुन त्यांचे कौतुकही केले.कोरोना संकटात जनतेच्या समस्या जाणून घेण्याबरोबर शासकीय अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचणार नाही याकडेही एक मंत्री म्हणून ना.शंभूराज देसाई बारकाईने लक्ष देत आहेत याचेही कौतुक केले जात आहे.