"नेमकं भेकड कोण❓"


"नेमकं भेकड कोण ?"


"सुशांतसिंग राजपूत च्या आत्महत्येने माझ्यासारख्या अनेक चाहत्यांना धक्का बसला. त्याचा सुंदर चेहरा,लोभसवाणे हास्य,आणि त्याच एकंदर "पवित्र रिश्ता"या मालिकेतील "मानव" नावाच्या पात्राने माझ्यासारख्या" डेली सोपं"चा तिटकारा असणाऱ्या मुलीला रोजचा एपिसोड तन्मयतेने बघण्यास भाग पाडले होते.त्यानंतर त्याचा चित्रपटसृष्टीतील विस्मयकारक प्रवास,नृत्यशैली,धोनी सारखं पात्र उभं करण्याचं कसब मला फार भावलं होत.


           तो गेला अचानक....मान्य करण, विश्वास ठेवणं आत्यंतिक कठिणतम वाटतं असताना....!!मग नेटकऱ्यांची रिप(rip)-रिप सुरू झाली. त्यात अनेकजण त्याला दोष देऊ लागले.अगदी सहजपणे"भेकड"होतास म्हणून हे आत्महत्येचे पाऊल उचललेस,तुला काय कमी होती?पैसा, नोकर-चाकर, मानमरातब, असंख्य तरुणी तुझ्यावर फिदा होत्या, तु दिसायलाही छान होतास,चित्रपटातील पात्र तू कणखरपणे रंगलवस मात्र,तसा प्रत्यक्ष आयुष्यात मात्र जगला-वागला नाहीस....!!का?तर तू भेकड होतास...!!म्हणून आव्हानांना घाबरून,किंवा चुका करून तू तुझं जीवन संपवलस....!!वगैरे वगैरे प्रत्येक नेटकऱ्याने आपापले मत नोंदवले,कोणतीही शहानिशा होण्याअगोदर, त्यातील सत्य बाहेर येईपर्यंत आजकाल कोणालाच वेळ नसतो हेही ह्या घटनेतून दिसून आले. कोणी त्याच्या आत्महत्येला त्याच्या मानसिक तणावाचे कारण दिले तर कोणी करियर सोबत त्याचा संबंध जोडला,कोणी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील मैत्रीणीच्या आत्महत्येने तो निराश झाल्याने असे वागला,तर कोणी म्हणे,बॉलीवूड मधील" नेपोटीझम"चा तो बळी ठरला...!!त्यातील सत्य आज न उद्या बाहेर येईलच,पण त्यासोबतीने "नैराश्य(डिप्रेशन)"हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला गेला.


            एकीकडे रोज हजारोंच्या संख्येने होणाऱ्या सामान्य माणसाच्या आत्महत्या कधी कोणाला दिसतात का?शेतकऱ्यांच्या आत्महत्या महत्वाच्या न वाटता एका चित्रपटातील हिरोला का बरं अनाठायी महत्व दिलं जातंय असाही एक सूर सोशल मीडियावर उमटलेला दिसत होता.त्यातील मला ठळकपणे जाणवलेल्या दोन गोष्टी :-एक म्हणजे-"नैराश्य(डिप्रेशन)"का येत?व प्रत्येकाने कुणाजवळ तरी आपल्या मनातील खदखद बोलायला हवी....!!


दुसरी गोष्ट म्हणजे:-"आयुष्यात कितीही अपयश, दुःख,नैराश्य आलं तरी नेहमीच सकारात्मक राहील पाहिजे,जो कोलमडून जातो,आत्महत्या करतो तो भेकड,कमकुवत असतो म्हणे....!!


  गोष्ट पहिली:-"नैराश्य(डिप्रेशन)का येत???


"पहिली गोष्ट म्हणजे आपण माणूस आहे,"मन"असणारा,भावना असणारा(मग ती चांगली-वाईट कशी का असेना) सजीव प्राणी....!!


       नैराश्य या भूतलावरील प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात एकदातरी येतेच,आलेलं असतं किंवा येणार असत.पण,व्यक्तिपरत्वे त्याच प्राबल्य, त्यातील दाहकता, त्या व्यक्तीच्या आसपास असणारे लोक,वेळ,घटना,स्वतः ती व्यक्ती त्या नैराश्याला कशी सामोरी जाते ह्यावर सार अवलंबून असते.


     "मला कधीही नैराश्य आलं नाही, येणार नाही, मी खूप सुखी,आनंदी मनुष्य आहे, मी सगळ्या जगाकडे,घटनेकडे सकारात्मक दृष्टीनेचं पाहतो... माझ्या रक्तातच लढवय्या बाणा मी जन्मल्यापासून भिनला आहे...असे म्हणणारे लोक मला "देवाचे अवतार"वाटतात.(एव्हढी फेकाफेक चांगली नसते.)


         नैराश्य प्रत्येकाला  येत,अपयश, दुःख, प्रेमभंग, नकारात्मक आजारपण घटना, सातत्याने होणारा शारीरिक-मानसिक-आर्थिक त्रास,फसवणूक, लुबाडणूक, नाकारलेपणा, एकलपणा, अतिभावनिक असणं,अतिविचारी असणं..., एखाद्या प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता नसणं,छक्के-पंजे न जमणं, सरळमार्गी असणं ह्या बाबी देखील नैराश्य घेऊन येतात.त्याचे प्रमाण व दाहकता हे व्यक्तिपरत्वे कमी-जास्त असू शकते. पण,नैराश्य,दुखावलेपण,.... निराश होणं,काहीही करण्याची इच्छा न उरण,कधी ना कधी प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी येतंच...!हे कोणी स्वतःच्या मनाशी बोलताना तरी नक्कीच नाकारणार नाही..!!


        मग निराश झाल्यावर खचल्यावर बरेचजण रडतात अगदी मनसोक्तपणे रडतात,शांत होतात सार विसरूनपुन्हा कामाला लागतात. कोणी,स्वतःला अधिकाधिक कामात, छंदात स्वतःला गुंतवून घेतात,तर कोणी आपले आई-वडील,बहीण-भाऊ,पती-पत्नी,इतर नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, सहचर यांच्यासोबत आपली समस्या बोलून व्यक्त होतात त्यातून मार्ग मिळाला तर पुढे मार्गस्थ होतात. तर काहीजण, स्वतःशीच विचार करून आत्मबलाच्या जोरावर पुनश्च हरी ओम म्हणून चालू लागतात. काहीजण,संगीत,गायन ह्यात मन रिझवतात व रिफ्रेश होऊन जगतात.काहीजण आध्यात्मिक साधना,ध्यानधारणा, योग याचा आधार घेतात नि नैराश्य,दुःख,अडचणी यांना भक्ती ची,साधनेची जोड देतात...!!


     काहीजणांना ह्यातील काहीच मार्ग त्यांच्या दुर्दैवाने गवसत नाही मग ते व्यसनांच्या आहारी जातात. त्यात डुंबून जाऊन आपली निराशा घालवू पाहतात.त्यातून योग्य मार्गदर्शक,शुभचिंतन करणारी व्यक्ती भेटली तर ठीक नाहीतर त्यांची परिणती व्यसनाधीन व्यक्तीत व कालांतराने आत्महत्या, अकाली मृत्यू ह्यात होते.


          निराश होऊ नका,आयुष्य खूप सुंदर आहे,सकारात्मक रहा, हेही दिवस जातील, कणखरपणे जगा, सकारात्मक बघा....असा सूर आळवणारे, किती जणांच्या निराशेत, अडचणीच्या काळात,दुःखात, आर्थिक अडचणीत, शारीरिक व्याधीच्या त्रासात, अपयशात हात देतात,मदत करतात????किमानपक्षी प्रेमाचे,धीराचे बोल बोलतात?


नाही न?.... उलट गंमत पाहतात,कसा निराश झाला, नापास झाला म्हणून खिल्ली उडवतात, एखाद्याच्या नवीन उद्योग-व्यवसाय यांच्या उभारणीत असंख्य अडथळे उभे करतात, त्याच्या कष्ट-मेहनतीला, दोन नंबरचा पैसा, चेटूक केलं असेल असे म्हणतात. नैराश्याच्या गर्तेत बुडालेल्या व्यक्ती नशिबाने मनोविकार तज्ञाकडे जाऊ लागली किंवा मनोविकार तज्ञाची मदत घेण्यासाठी विचार मांडला तरी मोठा गहजब केला जातो. त्याला/तिला" वेड", "सायको" ठरवून मोकळे होतात.दुर्लक्ष करतात. मग ती व्यक्ती खरच वेडी बनून रस्त्यावर फिरत असते,अशा असंख्य व्यक्ती ज्या कधीकाळी खूप यशस्वी, शिक्षित होत्या, त्या देखील वेडसर बनून रस्त्यावर मनोरुग्ण बनून फिरताना आपल्या अवतीभवती फिरत असतात नि आपण बऱ्याचदा त्यांना दुर्लक्षतो...!!पचायला थोडं कठीण आहे पण,निर्विवाद सत्य परिस्थिती देखील हीच आहे.आपण सहजपणे दुसऱ्यांच्या दुःखाला, अपयशाला, वेदनेला,मनातील खदखदणाऱ्या कोलाहालाला साह्यभूत होतो का?होत असू तर चांगली गोष्ट आहे का?त्या त्रासाला आपण कमी करण्यास मदत करतो का?. पण नसेल तर मग त्यांना भेकड म्हणणं देखील बरोबर नाही!!खरे भेकड तर आपणच ठरतो त्यांना आणखीन नैराश्यात लोटणारे..!!


           कधी-कधी टोकाची भूमिका घेणारे, आत्मघातकी वागणारे लोक,आपली खदखद व्यक्त करू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत, लोक हसतील,नावे ठेवतील,वेगळ्या नजरेने आपल्याकडे पाहतील,आपल्या विपरीत परिस्थितीने आणखी आनंदी होतील,चर्चेचे चर्वण करत गावभर भटकत फिरतील या नि यासारख्या असंख्य बाबी मनात घर करतात नि ह्या गोष्टींपेक्षा आत्मघात करणं ,स्वतःला संपवण, किंवा कोशात राहणं बर वाटू लागतं....!!" आपलं दुःख,त्रास आपल्याला असाही विचार त्यामागे असतोच की...!!त्याचं भांडवल करणारे मग त्या निराशा(डिप्रेशन)पेक्षा भयंकर असतात...!!क्षणाक्षणाला असंख्य यातना देणारे...नाही का?


"दुसरी गोष्ट:-"आत्महत्या करणारे भेकड असतात?"


        आत्महत्या केली,म्हणजे ती व्यक्ती जगण्यास लायकच नव्हती मुळी असे म्हणणे खरंच योग्य आहे का?भलेही त्या व्यक्तीचे ते चुकीचे पाऊल, चुकीचा निर्णय असुद्या...!!पण जगण्यास ती लायक नव्हती असे म्हणणे सपशेल चुकीचे व अतार्किक आहे असे मला वैयक्तिक वाटते.बरेचदा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या भावना,विचार, आंतरिक खळबळ व्यक्त करायला, बोलायला विश्वासार्ह व्यक्ती मिळत नसते,आणि असली तरी त्या व्यक्तीला त्रास देणं कधी-कधी नको वाटतं." आपुलाचं वाद-संवाद आपणाशी"असा काहीसा विचार मनात डोकावून जातो नि बोलणं, व्यक्त होणं सार राहून जात...!!


          भलेही आपण ती व्यक्ती गेल्यावर म्हणतो,मी त्याच्यासाठी हे केलं असत,ते केलं असतं, पण त्या बरेचदा हवेतल्या बाता असतात. "ती" व्यक्ती जीवंत असताना,किती आपण मदतशील, प्रेरक,साहाय्यक ठरतो हा देखील विचार करण्याजोगा विषय ठरू शकतो.


          दुसरी बाब म्हणजे, कोणतीही व्यक्ती आपल्याला आलेली निराशा-अपयश-दुःख-यातना सहजपणे कुणाजवळ बोलत नाही, लपविण्याकडे,आपलं जगणं-वागणं जगापासून कोसो दूर असावं,आपण आपल्या आयुष्यात खूपच आनंदी,यशस्वी, उत्साही आहोत असेच सगळ्यांना वाटावं अस बहुतांशी लोकांना वाटतं.मग,सुरू होतो,लपवाछपवी चा खेळ, छान-छान वागणं,जगणं...सध्या तरी सोशल मीडियावर मुखवटे घेऊन सारं काही आलबेल आहे असं दाखवणं अस सुरू होत.मग नैराश्याच्या उद्रेकाची वाफ आणखी तीव्रतेने बाहेर पडू पाहते नी त्याची परिणती आत्मघातात होते. मग साऱ्या ओळखणाऱ्यांना हे धक्कादायक वाटतं...!!कारण फक्त आणि फक्त एकच...."आपलं असणं नि दिसण"ह्यात अदृश्य सीमारेषा आखल्यामुळे...!!


        "मग हे आत्महत्या करणारे लोक भेकड असतात का?


तर मुळीच नाही न..!!मग असे जगात खूप लोक होते की जे त्यांच्या क्षेत्रात खूप प्रसिद्ध होते, यशस्वी होते तरीही त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एका वळणावर आत्महत्या केली, तशी टोकाची भूमिका घेतली.त्यातील तर बहुतांशी संघर्षातून यशोशिखरावर पोहोचले होते,मग त्यांच्याकडे लढवय्या बाणा, सकारात्मक विचार, सातत्य, अपयश पचविण्याची ताकत, मनोबल नव्हते का तर तसे मुळीच नव्हते,फक्त त्या बिकट क्षणी योग्य आधार,समंजसपणे समजून घेणारी व त्यावर कोणत्या प्रकारचा विवाद, मत न मांडता फक्त मनात साचलेले मळभ दूर करणारी व्यक्ती हवी असते ती दुर्दैवाने त्यांना मिळत नाही....!!


      "परमपूज्य साने गुरुजी तर सालस, समंजस, प्रांजळ व्यक्तिमत्त्व, पण त्यांनीही आत्महत्या केली, मग त्यांना देखील"भेकड"म्हणायचं का?तर नाही ते तर अतिशय संवेदनशील, सदभावना असणारे होते,पण त्यांनीही टोकाचे पाऊल उचलले ना?


        खरेतर,प्रत्येकाने विचार करायला हवा, नि त्याबरहुकूम वागायला देखील हवं,नुसतं गुळमुळीत बोलून,ज्ञानाचे डोस पाजून,मोठी-मोठी वाक्ये फेकून,प्रेरणा, यश,जिंका, जगा म्हणणं म्हणजे मोठे तीर मारणे नसते हो...!!त्याआधी दुसऱ्यांच्या मनाचा,भावनांचा,आपण किती चांगल्या पद्धतीने विचार करतो,दुसऱ्या जीवाच्या जगण्याला आपण किती बळ देतो हेही तितकेच महत्वाचे असते..!!नाहीतर एकीकडे म्हणायचे जिंका....जिंका....लढा....लढा....नि दुसरीकडे पाय खेचण्याची खेकडा वृत्ती,एखाद्या होतकरू व्यक्तीला पुढे जाऊ द्यायचे नाही, त्याच्या मार्गात असंख्य काटे पसरायचे,अडथळे आणायचे,राजकारण, सत्तांधपणा, जातीयता, विषमता मात्र स्वतःच्या व "इतरांच्या अंगात , विचारात ठासून भरायची....!!मग काय बरे उपयोग??अशा कोरड्या ठाण "नसलेल्या" माणुसकीचा??" नि आत्महत्या आणि ते करणारे यांचे व त्यासाठी प्रेरक ठरणारे ह्या तिन्हीचे मी अजिबात समर्थन करत नाही"


      "मग सांगा पाहू खरे भेकड कोण बरे?"


- शुभांगी पवार (कंदी पेढा)


 


Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज