"परमपूज्य साने गुरुजी:- अल्प परिचय"


"परमपूज्य साने गुरुजी:- अल्प परिचय"


साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी कोकणातील "पालगड "या गावी झाला.साने गुरुजींचे वडील "सदाशिवराव "खोताचे काम करीत असत. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते." श्यामची आई" या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. सर्वांवरती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींच्या आईंनीच त्यांना दिला. साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान व संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सद्भावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली. गुरुजींनी विपुल वाङ्मय लिहिले आहे. कादंबऱ्या लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद, इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती. त्यांच्या वाङ्मयातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींचा वर्षाव झालेला आहे. त्यांच्या भाषेला एक प्रकारची धार आहे, बोध आहे. त्यांची साधीसुधी भाषाच लोकांना आवडली. गुरुजींनी आपले सर्व लेखन समाज उध्दारासाठी केले. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणी द्वारे प्रकट केले. साने गुरुजी यांची कर्मभूमी खानदेशची. अमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिर आणि प्रताप विद्यालयात त्यांनी अध्यापन केले. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवास झाला. नाशिक कारागृहात त्यांनी" श्यामची आईचे "लेखन पूर्ण केले. धुळ्यातील कारागृहात असताना त्यांनी विनोबा भावेंनी सांगितलेली "गीताई" लिहिली. मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. “श्याामची आई‘ च्या एकपात्री प्रयोगांनी तर संस्काराची शिदोरी अधिकच घट्ट केली. गुरुजींनी अंमळनेर, धुळे व काही काळ नाशिक येथे वास्तव्य करून खानदेशला कर्मभूमी बनविले. गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे "आंतरभारतीची स्थापना "करण्याचा प्रयत्न होय. प्रांताप्रांतातील हेवादेवाही अद्याप नष्ट झालेला नाही. भारतीयाच्या एकत्वताला बाधक ठरणार असे दिसू लागले म्हणून त्यांनी प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्वत्र बंधूप्रेमाचे वारे वाहावे यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतन प्रमाणे काही सोय करावी, हि मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्यसंमेलनामध्ये याच ठरावावर बोलत व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण,हे कार्य अपूर्ण असतानाच त्यांनी आत्महत्या केली.


         पांडुरंग सदाशिव साने "साने गुरूजी" नावाने प्रसिद्ध होते.ते स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. 'श्यामची आई', 'नवा प्रयोग', 'सुंदर पत्रे', 'हिमालयाची शिखरे', 'क्रांती', 'समाजधर्म', 'आपण सारे भाऊ' इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे.त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती. १९२८ साली त्यांनी "विद्यार्थी "हे "मासिक "सुरू केले. त्यांच्यावर "महात्मा गांधींच्या" विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वत: खादीचाच वापर करत असत. १९३०साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून "सविनय कायदेभंगाच्या चळवळीत "भाग घेतला. त्यांनी काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकर्‍यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी कार्य केले. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी मैला वाहणे व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.          


 मा.साने गुरुजी यांचे ११ जून १९५० रोजी निधन झाले.


✒️©️शुभांगी विलास पवार(कंदी पेढा)-नागठाणे, सातारा