लाॅकडाऊनमध्ये डाकेवाडीच्या तरुणांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
तळमावले/वार्ताहर
कोरोनाच्या संकटामुळे पुणे, मुंबईतील चाकरमानी सध्या गावाकडे आहेत. या लाॅकडाऊनचा चांगला उपयोग पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील तरुणांनी केला आहे. शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या तरुणांनी लाॅकडाऊनच्या काळातील संधीचे सोने केले आहे. सध्या या भागात खरीप पेरणीची धांदल सुरु आहे. या धांदलीमधून वेळ काढत येथील तरुणांनी जि.प.शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले आहे. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना या तरुणांमध्ये होती. त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक महादेव गेजगे, रणजित शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेच्या आवारामध्ये सुमारे 35 रोपे लावली आहेत. चाफा, जास्वंद, तुती, पिंपळ अशी विविध वृक्ष लावली आहेत. विशेष म्हणजे हा उपक्रम मास्क वाप3न तसेच सोशल डिस्टन्स पाळून राबवण्यात आला आहे.
यापूर्वी लोकसहभागातून जि.प.प्राथमिक शाळा डाकेवाडीचे काम करण्यात आले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या स्वच्छ सुंदर गुणवत्तापूर्ण उपक्रमशील स्पर्धेत शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या रंगरंगोटीमध्ये शिवछत्रपती प्रतिष्ठानचा मोलाचा वाटा आहे. पाटणचे गटशिक्षणअधिकारी नितीन जगताप यांनी प्रत्यक्ष भेट देत शाळेचे कौतुक केले आहे. गुणवत्तेच्या बाबतीत डाकेवाडी ही शाळा सुरुवातीपासूनच अग्रेसर आहे.
शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी या शाळेतील 60 मुलांना बॅग वाटप, शाळेला संगणक भेट तसेच शाळा रंगवण्यासाठी मदत केली आहे.
वृक्षारोपण प्रसंगी विकास डाकवे, विकास जाधव, रविंद्र डाकवे, रमेश जाधव, राजेंद्र डाकवे, संतोष डाकवे, कृष्णा डाकवे, प्रदीप जाधव, कृष्णा चिंचुलकर, अनिल चिंचुलकर व प्रतिष्ठानचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवछत्रपती प्रतिष्ठान ने राबवलेल्या या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून आणि परिसरातून कौतुक होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
लाॅकडाऊनचा कालावधीत गावातील तरुणांनी वृक्षारोपणाचा राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही शिक्षक सर्वोतोपरी प्रयत्न करत असतो. शाळेच्या प्रगतीच्या वाटचालीत डाकेवाडी ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग आहे. सर्वांच्या प्रयत्नामुळेच शाळेचे रुप पालटले आहे. याचे मला मनापासून समाधान आहे.
- महादेव गेजगे, मुख्याध्यापक-जि.प.शाळा डाकेवाडी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖