महाराष्ट्र शासनाच्या विविध माथाडी मंडळातील नोंदीत असलेल्या माथाडी कामगारांनी आप-आपल्या कामावर हजर रहावे : ना. नरेंद्र पाटील


महाराष्ट्र शासनाच्या विविध माथाडी मंडळातील नोंदीत असलेल्या माथाडी कामगारांनी आप-आपल्या कामावर हजर रहावे : ना. नरेंद्र पाटील


मुंबई : नव्यामुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केट, मसाला मार्केट,अन्न-धान्य मार्केट, भाजीपाला व फळे मार्केट आवारातील कामे सुरु असून, माल वाहतूक, लोखंड व पोलाद, रेल्वे माल धक्के तसेच महाराष्ट्रातील इतर बाजार समितीच्या आवारातील व इतर व्यवसायातील कामे पूर्ववत चालू होत असून, महाराष्ट्र शासनाच्या विविध माथाडी मंडळातील नोंदीत असलेल्या माथाडी कामगारांनी आप-आपल्या कामावर हजर रहावे आणि आपल्या हक्काच्या कामाचे रक्षण करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नामदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य रोगाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने दि.२२ मार्च,२०२० पासून देश व महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन जाहीर केला होता, तेव्हापासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारातून नागरिकांना जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्याकरिता बाजार आवारातील कामे चालू आहेत, इतर व्यवसायातील कामे लॉकडाऊनमुळे बंद होती, त्यामुळे विविध माथाडी मंडळात नोंदीत असलेले माथाडी कामगार आपल्या मूळ गावी गेलेले आहेत तर कांही कामगार मुंबई-नवीमुंबईतील आपल्या राहत्या घरात थांबलेले आहेत. कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य रोगापासून माथाडी कामगारांचे रक्षण होण्यासाठी विविध बाजार समित्या,माल वाहतूक व इतर सर्व व्यवसायातील कंपन्याकडून मास्क, हँडग्लोज, सॅनिटायझर व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल संघटनेने मागणी केली असून, तशा सूचना राज्य सरकारने देखील दिलेल्या आहेत. माथाडी कामगारांची कामे सुरळीत चालणे,माथाडी कामगारांना त्यांचे हक्काचे कामे मिळणे,कामगार आप-आपल्या कामावर हजर रहाणे व त्यांना कोरोनापासून बाधा होऊ नये म्हणून आवश्यकत्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संघटना सतत प्रयत्न करीत आहे, स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी कष्टाची कामे करणाऱ्या कामगारांना संरक्षण मिळवून देण्यासाठी माथाडी कामगार संघटनेची स्थापना केली असून, आपल्या संरक्षणासाठी संघटनेची मुंबईतील मुख्य कार्यालय,नव्यामुंबईतील माथाडी भवनमधील कार्यालय व इतर शाखा कार्यालय लॉकडाऊन कालावधीपासूनच चालू आहेत. माथाडी कामगारांची कामे आता पूर्ववत सुरु होत असून,कंपनी मालक,व्यवस्थापन यांनी माथाडी कामगारांनी कामावर हजर रहाण्याच्या सूचना करण्याबद्दल माथाडी मंडळे व संघटनेकडे मागणी व विनंती केली आहे. माथाडी मंडळांनी देखील माथाडी कामगारांना कामावर हजर रहाण्याचे आदेश काढलेले आहेत. जे कामगार गावाहून मुंबईकडे येणार आहेत त्यांना ई-पास तातडीने उपलब्ध करून देण्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या कामगार विभागाने शासन जीआर काढलेला आहे. कोरोना या संसर्गजन्य रोगावर मात करत आपल्या व कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेत आपले हक्काच्या कामाचे रक्षण करणे,आपली रोजी-रोटी अवलंबून असलेली कामे करणे हे आता माथाडी कामगारांचे कर्तव्य आहे, म्हणून तमाम माथाडी कामगारांनी आप-आपल्या कामावर हजर रहावे, आपल्या हक्काच्या कामाचे रक्षण करावे, आपले व कुटुंबियांचे आरोग्य सांभाळावे असे कळकळीचे आवाहन माथाडी कामगार नेते नामदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी शेवटी पत्रकातून केले आहे. महाराष्ट्र राज्यात ज्या-ज्या वेळी संकटे आली त्या-त्या वेळी नागरिकांना जिवनावश्यक वस्तुंच पुरवठा होण्यासाठी माथाडी कामगार अग्रेसर राहिला, स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वारसा माथाडी कामगारांनी सतत जतन केला, त्याबद्दल कामगारांचे आभार व्यक्त करून हा वारसा आपण यापुढेही जतन करावा,अशी विनंती देखील माथाडी नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केली आहे.