"स्मगलर" एक वल्ली-भाग :२


"स्मगलर" एक वल्ली-भाग२


"माझ्या मनात घोंघावणारे "स्मगलर"विषयीचे अनेक प्रश्न मनातच विरून जायचे.कस विचारावं आई-पपांना?त्यांनी खरेच त्याला पोलिसात दिले तर???त्याला पोलीस खूप मारतील, अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवतील,नि पिक्चर मध्ये दाखवतात तसे त्याला साखळीने बांधून ठेवतील. आणि जरमन(अल्युमिनियम)च्या चेपलेल्या ताटलीत जाडीभरडी भाकर खायला देतील नि त्याच्याकडून दगड फोडणे,गवत काढणे,जात्यावर पीठ काढणे असली कामे करून घेतील... नी म्हणतील...."क्या रे स्मगलर....चक्की पिसिंग....!!"नि हे चाबकाच्या एकाच फटकाऱ्याने त्याची आधीच रापलेली कातडी काळी-निळी करून टाकत आहेत.अस चित्र झरझर माझ्या डोळ्यासमोर तरळत रहायचं नि मी मनातल्या मनात देवा मला माफ कर रे असे म्हणून,त्याच्याविषयी काही विचारायचं, बोलायचं धाडस करणं सपशेल टाळत असे...!!कारण,तो चोरी करत असला तरी आम्हाला जवळचा का वाटायचा?त्याच्याबद्दल आत्मीयता का वाटायची ?हे मात्र काही केल्या कळतच नव्हते..!!पण ....आपलेपण...त्याच्या सारख्या येण्याच्या सवयीमुळे वाढीस लागले होते एव्हढं मात्र नक्की...!!


       पण" स्मगलर"भारीच भन्नाट असामी होती.हातोहात एखाद्याच्या शेतातील भाजीपाला, फळ तो सराईतपणे तोडून आणत असे, तेही त्या शेतमालकाच्या कधीही हाती न लागता ,त्याच्या हातचा दंडुका न खाता हे महत्वाचे विशेष होते...!!त्याचा हा शिरस्ता आम्ही कॉलनीत असेतो कधीही चुकला नाही!!


         त्यानं हक्कान कॉलनीत याव नि आई कामात असावी असच व्हायचा बहुदा,नि मग त्याच ते गळ घालून,गोड बोलून"बघा न आत्ता आणला हाय ताजा माल, घ्या की व मावशी", अजून पिरू बी हायती बघा पोरांसाठी सगळं घेतलं तर बरं पडलं वं...!!"अशी बोलणी तो करायचा.कॉलनीतील सगळ्या स्त्रिया ह्या गृहिणी असल्याने त्यांच्याकडे पैसे असे नसायचेच..!! असले तर कुठे चिल्लर साठवलेला डबा.मग "जा ग पप्पाना बोलवून आण, हाक मार अशी आज्ञा आईकडून मला व्हायची....नि घर ते पप्पांचे ऑफिस एका सरळ रेषेत(मोठ्या साहेबांच्या बंगलोवजा घरामुळे त्यात अडसर होता म्हणा..!!)१००-१५०मीटर मध्ये असल्याने आम्ही टणाटण उड्या मारत पप्पांना बोलवायला जात असू नाहीतर सरळ गगनभेदी "पप्पा या"ची आरोळी ठोकत असू...!!त्याबद्दल  मग नंतर चांगलीच कानउघाडणी होत असे त्याच्याही आणखीनच भन्नाट कहाण्या आहेत...त्या कधीतरी नक्कीच सांगेन.....!!!


       मग 'पपा यायचे व त्यांच्यात फायनल डील व्हायची....!असेच सगळ्या कॉलनीतील प्रत्येक घरी घडायचं!तेही करताना त्याच्या अजबगजब व्यवहाराची व अति घाईची मला मात्र अजब गंमत वाटायची.१०रुपयांची जिन्नस तो सहजपणे २,३रुपयाला द्यायला तयार होई तर कधी-कधी २रुपयांची वस्तू १००रुपयांचीच आहे ह्या थाटात हटून बसे.(ह्या चक्रमपणाच मला मात्र कोडंच पडायचं)त्याच ओणवे बसून आपल्या धोतराच्या सोग्यातून,शर्टाच्या खिशातून,शर्टाच्या आतील दंडकीतून ,कधी कधी तर चक्क डोक्यावरील फेट्यातून आंबे,पेरू, सीताफळ,कोथिंबीरीची जुडी, लिंबू, काकडी,आलं,भुईमुगाच्या शेंगा.... नि बरच काही एकामागून एक बाहेर पडत रहायच.नि मला त्यावेळी "स्मगलर" म्हणजे साक्षात जादूगारच भासायचा...!!जो त्याच्या उभट -लांब टोपीतून एकामागून एक वस्तू बाहेर काढत जातो नि खूप वेळ त्या निघतच असतात.संपतच नाहीत...!!अगदी तंतोतंत तसाच तोही वाटतं राहायचा...!!


(क्रमशः)


 


शुभांगी पवार (कंदी पेढा)


"फोटो साभार:-"shutterstock"