कोरोनामुक्तीच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटलची ‘सेंच्युरी’.

 कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची शंभरी


कोरोनामुक्तीच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटलची ‘सेंच्युरी’


आज 19 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज; जिल्हाधिकाऱ्यांनी केले विशेष कौतुक. 


 


कराड, ता. 1 : सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 19 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल 100 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले असून, कोरोनामुक्तीच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या योगदानाचे विशेष कौतुक जिल्हाधिकारी शेखर सेह यांनी केले आहे.


 


दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोरोनाने मोठा हाहाकार निर्माण केला. अगदी पहिल्या टप्प्यातच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा तुलनेने सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यातही कराडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदविस वाढू लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरले. दरम्यान, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचारास प्रारंभ झाला आणि 18 एप्रिल रोजी कराड तालुक्यातील पहिल्या असणाऱ्या तांबवे येथील कोरोनामुक्त रूग्णाला टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्टिलटने यशस्वी उपचाराने कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना, सन्मानपूर्वक डिस्चार्ज देण्याची मालिकाच सुरू केल्याने लोकांमधील कोरोनाबद्दलची भिती कमी होण्यास मदत झाली. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 100 व्या कोरोनामुक्त रूग्णाला कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.


 


आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये गावडेवाडी येथील 20 वर्षीय युवक, उंब्रज येथील 40 वर्षीय पुरूष, म्हासोली येथील 37 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगी, शिराळ-पाटण येथील 26 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, भरेवाडी-पाटण येथील 36 वर्षीय पुरूष, बनपुरी-पाटण येथील 31 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय युवक, 48 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय मुलगा, 8 वर्षीय मुलगा, शितपवाडी-पाटण येथील 40 वर्षीय पुरूष, 14 वर्षीय मुलगा, 19 वर्षीय युवक, ढेबेवाडी फाटा येथील 23 वर्षीय पुरूष, 44 वर्षीय महिला, 18 वर्षीय मुलगी अशा एकूण 19 जणांचा समावेश आहे. 


 


यावेळी कोरोनाची लढाई यशस्वीपणे जिंकलेल्या या कोरोनामुक्त रूग्णांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. सिंह म्हणाले, कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत 100 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, ही आपल्या जिल्ह्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कोरोनामुक्तीच्या या लढाईत डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स व अन्य स्टाफने अमूल्य योगदान दिले आहे. सातारा जिल्ह्यात अद्ययावत व अत्याधुनिक आरोग्यविषयक सोयीसुविधा असणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलमुळे आज याठिकाणी 100 रूग्ण कोरोनामुक्त होण्यात यश प्राप्त झाले असून, मी डॉ. सुरेश भोसले आणि कृष्णा हॉस्पिटलच्या सर्व टीमचे सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने विशेष अभिनंदन करतो.


 


दरम्यान, कृष्णा हॉस्पिटलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोरोना विशेष वॉर्डकडे जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसेच अन्य रूग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत कमी कालावधीत कृष्णा हॉस्पिटल व्यवस्थापनाने तयार करण्यात आलेल्या या विशेष मार्गाचे कौतुक केले.


 


याप्रसंगी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर, राजेंद्र संदे, कॉन्ट्रॅक्टर दिपक रैनाक यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.