गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडून शिवसमर्थ वर कौतुकाची थाप
तळमावले/वार्ताहर
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.आॅप.क्रेडीट सोसायटी लि; तळमावले यांचेवर कौतुकाची थाप मारली आहे. 23 मार्च ला लाॅकडाऊन झाल्यानंतर संस्थेने केलेल्या सेवेला यानिमित्ताने ‘चार चाॅंद’ लागले आहेत. शिवसमर्थ च्या वतीने हा सन्मान संस्थेचे उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे यांनी स्वीकारला. प्रशस्तीपत्र व बुके देवून हा सन्मान झाला. यावेळी व्यासपीठावर खा.श्रीनिवास पाटील, आ.शशिकांत शिंदे, सातारा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सातारा पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या या प्रशस्तीपत्रात म्हटले आहे की, सध्या सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. संपूर्ण जगात या साथीचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. प्रशासनाचे खांद्याला खांदा लावून सतर्क नागरिकांनीही कोरोनाच्या लढयात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
आपण सातारा जिल्हा पोलीस दलात फेसशिल्ड पुरवले या स्वरुपात मदत केली आहे. आपल्या या सहकार्याबद्दल मी सातारा पोलीसांचे वतीने कृतज्ञता व्यक्त करते व आभार मानते.
कोरोना या विषाणूचे संसर्गाचा प्रादुर्भाव रोखणेकरीता आपण आपले कर्तव्य पार पाडत आहात. भविष्यातही आपण आपले कर्तव्य अशाच तत्परतेने, उत्तमरीत्या व दृढ निश्चयाने पार पाडून सातारकर म्हणून जिल्हयाची प्रतिमा उंच कराल असा आम्हास पूर्ण विश्वास आहे. आपल्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...!
त्याचबरोबर यापूर्वी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाखाचा धनादेश दिला आहे. महिला बचत गटांकडून बनवलेले मास्क ग्रामीण भागातील वाडयावस्त्यांवर वाटले आहेत. पोलीसांना फेसशिल्ड वाटप, कोरोना प्रतिबंधासाठी व्हिडीओ क्लिप, पोलीस पाटील, पत्रकारांसाठी जीवनावश्यक कीट इ. गोष्टींच्या माध्यमातून संस्थेने कोरोना विरुध्दच्या लढयात सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर शिवसमर्थ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 24 तास सेवा देण्याचाही प्रयत्न केला आहे.
तळमावले, ढेबेवाडी, कुंभारगांव या विभागातील सर्व एटीएम बंद असताना संस्थेने आपल्या एटीएमच्या माध्यमातून लोकांची होणारी गैरसोय थांबवली आहे. संस्थेच्या या विविध उपक्रमांचे जनमानसांत कौतुक होत आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या शाबासकीच्या थापेमुळे कोरोना कालावधीत संस्थेने दिलेल्या योगदानाचा गौरवच झाला आहे.