काळगांव विभागात पेरणीची लगबग

 डाकेवाडी (काळगांव) येथे पेरणी करत असताना शेतकरी बांधव. 


काळगांव विभागात पेरणीची लगबग


तळमावले/वार्ताहर


काळगांव विभागात सध्या पेरणीची लगबग सुरु असलेली दिसून येत आहे. त्यामुळे शेतीशिवार अगदी माणसांनी गजबजून गेला आहे. एरवी उन्हाळयातच धूळवाफेवरील पेरणी केली जाते. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, मका इ.पीके घेतली जातात. परंतू यावेळी धूळवाफेवरील पेरणी झाली नाही. यंदाच्या उन्हाळयात वळीवाचा मोठा पाऊस या विभागात झाला नाही. त्यामुळे लोकांची मशागत देखील चांगली झाली नाही. दोन दिवसापूर्वी ‘निसर्ग’ वादळामुळे आलेल्या या परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे लोकांनी पेरणीची कामे युध्दपातळीवर सुरु केली आहेत.


नांगर, कुळव, पाटे, कुरी, बांडगे इ. पारंपारिक शेती औजारांच्या साहय्याने लोक शेती करत आहेत. क्वचितच ट्रॅक्टर सारख्या औजारांचा वापर करत आहेत. बहुतांशी गावात कमी बैलजोडया आहेत. त्यामुळे लोकांची पेरणी करत असलेल्या बैल मालकांकडून आपली शेती प्रथम पेरुन घेण्याची गडबड सुरु आहे.


यावेळी नेहमीपेक्षा जास्त क्षेत्र पेरले जाण्याची शक्यता आहे. कारण लाॅकडाऊनमुळे पुणे, मुंबई या ठिकाणी असणारी बहुतांशी मंडळीनी शेतीमध्ये मेहनत


घेतली आहे. ज्या शेतात कधीही मशागत केली जात नव्हती. किंवा कामाधंद्यानिमित्त अन्यत्र असलेल्या लोकांनी शेतीकडे दुर्लक्ष केले होते. त्या लोकांनीदेखील यावेळी शेतीमध्ये पेरणी करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. ‘गडया आपला गावच बरा’ असे म्हणत शेतीमध्ये या लोकांनी आपला वेळ दिला आहे. पेरणीमुळे सर्व लोक शेतामध्ये दिसत आहे. सर्व शिवार माणसांनी फुलून गेला आहे.


काळगांव विभागातील डाकेवाडी, लोटळेवाडी, येळेवाडी, करपेवाडी, मस्करवाडी, चोरगेवाडी, वेताळ, निवी, सलतेवाडी, मत्रेवाडी इ.वाडया वस्त्यांवर सध्या पेरणीची लगीनघाई सुरु असल्याचे दिसून येत आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


सध्या शेत शिवार माणसांनी गजबजून गेला आहे. पेरणीच्या व शेतीच्या कामात एकमेकांना सहकार्य करण्याची भावना अजूनही लोकांच्या मध्ये आहे. एका मालकाच्या शेताच्या बाजूला दुसर्‍या मालकाची असलेली शेती एकाच औताच्या साहय्याने करण्यास लोक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये एकोप्याची भावना अजूनही कायम असल्याचे दिसते.


- श्री.राजाराम डाकवे, शेतकरी


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖