सातारा येथील महाराष्ट्र स्कुटर्स कंपनीचा प्लान्ट तातडीने सुरु करा आ. शिवेंद्रसिंहराजेंची मागणी; खा. शरद पवारांचा सकारात्मक प्रतिसाद


खा. शरद पवार यांच्याशी चर्चा करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले. शेजारी उदय देशमुख, राजेंद्र मोहिते, धैर्यशील भोसले आदी...


सातारा येथील महाराष्ट्र स्कुटर्स कंपनीचा प्लान्ट तातडीने सुरु करा आ.शिवेंद्रसिंहराजेंची मागणी;


खा. शरद पवारांचा सकारात्मक प्रतिसाद


सातारा: सातार्‍यात औद्योगिकरणाला चालना मिळावी आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी नेहमी आग्रही असणार्‍या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथील महराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्लांट सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु ठेवला आहे. आज सातारा दौर्‍यावर आलेल्या खा. शरद पवार यांची भेट घेवून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ही कंपनी चालू करण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालावे, अशी कळकळीची मागणी केली. याबाबत आपण स्वत: लक्ष घालू आणि हा प्रश्‍न सोडवू असे आश्‍वासन खा. पवार यांनी यावेळी दिली.


यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज येथे कार्यक्रमासाठी आलेल्या खा. पवार यांची आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी भेट घेतली. कंपनी सुरु करण्याबाबतचे निवेदन त्यांना देण्यात आले. यावेळी मासचे अध्यक्ष उदय देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, सचिव धैर्यशील भोसले, माजी अध्यक्ष सुरींदर अंबरदार, सहसचिव दीपक पाटील, सागर कलानी आदी उपस्थित होते.  


औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स ही एक जुनी आणि महत्वाची कंपनी आहे. मात्र या कंपनीचे कामकाज गेले अनेक वर्षांपासून बंद आहे. सदर कंपनीबाबत सरकार आणि बजाज यांच्यात लवादाकडे अनेक वर्ष खटला सुरु होता. खटल्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निकाल श्री. बजाज यांना मान्य आहे. मात्र महाराष्ट्र सरकार सदर निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही श्री. बजाज यांच्या बाजूने निकाल दिला आहे. सातार्‍यातील उद्योजकता आणि रोजगार निर्मीतीची निकड पाहता महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी तातडीने सुरु होणे आवश्यक आहे.


   सातार्‍यातील सुमारे ४७ एकर क्षेत्रात असलेला महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्लांट बंद असल्याने या कंपनीवर अवलंबून असणारे अनेक सुक्ष्म व लघू उद्योग सध्या बंद आहेत. यामुळे बेरोजगारीची समस्या जटील बनली आहे. हे लहान- लहान उद्योग सुरु झाल्यास सातार्‍यातील औद्योगिकरणास चालना मिळणार असून बेरोजगारी नष्ट होण्याबरोबरच संबंधीत उद्योगाशी निगडीत कुटूंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटणार आहे.


महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी पुन्हा सुरु झाल्यास सातारा येथील सुशिक्षित आणि गरजू बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे शासनस्तरावर महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्लांट लवकरात लवकर सुरु व्हावा, याबाबत राज्य सरकारने ठोस निर्णय घेणेबाबत आपण स्वत: लक्ष घालावे आणि औद्योगिकरण आणि बेरोजगारीशी निगडीत प्रश्‍न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी खा. पवार यांच्याकडे केली. यावर मी स्वत: श्री बजाज आणि राज्य सरकारमधील संबंधीत विभागांची बैठक घेवून हा प्रश्‍न सोडवतो, असे आश्‍वासन खा. पवार यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना दिले.