सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 167 बंदी कारागृहातून तात्पुरत्या जामीनावर सोडले

 सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव


रोखण्यासाठी 167 बंदी कारागृहातून तात्पुरत्या जामीनावर सोडले


 


    सातारा, दि. 20 (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीमध्ये मा. सर्वोच्च न्यायालय यांनी कारागृहातील बंद्यांना संसर्ग होवू नये म्हणून सुमोटो याचिका क्र.1/2020 द्वारे दिलेल्या आदेशान्वये तसेच उच्च न्यायालयाच्या राज्य उच्च अधिकार समितीने दिलेल्या निर्देशान्वये सातारा जिल्ह्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृह, येथून एकूण 573 अंतरीम जामीन अर्ज प्राप्त झाले.


  त्यापैकी 188 अंतरीम जामीन अर्ज मंजूर झालेले आहेत. सातारा व कळंबा कारागृहातून न्यायाधीन बंद्यांचे अंतरीम जामीन अर्ज संबंधीत न्यायालयाकडे पाठवून जामीन अर्जाचे कामकाज पाहणेसाठी मोफत विधीज्ञ यांची नेमणूक करुन दि.23 मार्च 2020 ते 15जून 2020 या कालावधीमध्ये मंजूर अंतरीम जामीन अर्ज कागदपत्रांची पूर्तता करुन एकूण 167 बंद्यांना मुक्त करण्यात आले आहे.


    संबंधीत कारागृहांना जामीनावर मुक्त केलेल्या बंद्यांना कोरोना संसर्गाबाबत योग्य ती खबरदारी घेवून घरी पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


    कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीमध्ये मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशानुसार मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून सातारा जिल्हा व सत्र न्यायालय इमारत व परीसर निर्जंतुकीकरण करुन घेण्यात आलेली आहेत.


    तसेच न्यायालयाचे कामकाज सकाळी 11 ते दुपारी 2 व दुपारी 2.45 ते 5.45 या दोन्ही सत्रामध्ये सुरु करण्यात आलेले आहे. न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ न्यायालयात येणारे सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, पक्षकार, कर्मचारी यांचे शारिरीक तापमान थर्मल स्कॅनरद्वारे तपासूनच प्रवेश दिला जातो व सर्व न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझर स्टॅन्ड बसवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्व न्यायदान कक्षामध्ये डायसवर पारदर्शक कागद बसवण्यात आलेला असून न्यायालयात येणा-या सर्व संबंधीतांना एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासंबंधी व अन्य महत्वाची काळजी घेण्याबाबतची फलके लावण्यात आलेली असून तशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांनी कळविले आहे.