कर्तव्य परायण - प्रा.ए.बी.कणसे


कर्तव्य परायण - प्रा.ए.बी.कणसे


बहुजन समाजातील सामान्य शेतकरी, शेतमजूर, सामाजिकदृष्टया मागासलेल्या, डोंगरकपारीत राहणाऱ्या उपेक्षितासाठी आणि त्यांच्या सामाजिक उत्थापनासाठी कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, शिक्षण महर्षी.बापूजी साळुंखे या सारख्या महान विभूतींनी आपले जीवन समर्पित केले. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. हे या शिक्षणमहर्षी नी अचूक हेरले आणि त्यासाठीच आपले जीवन वेचले. आज महाराष्ट्रातील हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात सर्वांगीण परिवर्तन पहावयास मिळते त्यांचा मुळ स्त्रोत या महामानवांच्या कार्यात सापडतो. मी 1972 साली ढेबेवाडी खोऱ्यातल्या  तळमावले या ठिकाणी इंग्रजी विषयाचा व्याख्याता म्हणून हजर झालो. साधे गावसुध्दा नाही अशी आडवळणी ठिकाणी डाॅ.बापूजी साळुंखेनी 1969 साली महाविद्यालय सुरु करण्याचे शिवधनुष्य उचलले होते. तळमावलेत त्यावेळी एक हाॅटेल आणि एक किराणा मालाचे दुकान एवढेच उपलब्ध होते. जून महिन्यात 11 वीचा रिझल्ट लागल्यानंतर काॅलेजला विद्यार्थी गोळा करण्यासाठी आजूबाजूच्या वाडीवस्तीवर प्राध्यापकांना भटकावे लागत होते. भर पावसात चिखलाच्या रस्त्यावरुन पॅंट गुडघ्यापर्यंत दुमडून प्राध्यापक घरोघरी जावून विद्यार्थांना काॅलेज प्रवेशासाठी मनधरणी करत होते. मुलगा 11 वी पास अगर नापास झाला की त्याला माथाडी म्हणून मुंबईला पिटाळायची पालकांची मानसिकता होती. त्यांचे मत आणि मनपरिवर्तन करुन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटविण्याची जबाबदारी प्राध्यापकांवर होती. त्यांच्या प्रयत्नांना यश येवून ज्या मुलांनी काॅलेज शिक्षणाचा रस्ता अवलंबिला ते पुढे भाग्यवान ठरले. अधिकराव कणसे या भाग्यवानांपैकी एक. या मुलांनी शिक्षणासाठी किती कष्टप्रद जीवन व्यतित केले याचा मी साक्षीदार आहे. पहाटे लवकर उठून आठ-दहा मैल पायी चालत तळमावल्यात येवून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. पुन्हा घरी जावून शेतातील कामात घरच्यांना मदत केली आणि पुढे, आयुष्यात उत्तुंग भरारी घेतली. कणसे सरांच्या प्राध्यापकीच्या यशामागे त्यांनी उच्च शिक्षणासाठी घेतलेले परिश्रम कुणाच्याही लक्षात येणार नाहीत. माझ्यासारख्या ज्यांनी अशा ठिकाणी प्राध्यापकी केली त्यानांच ते कळेल. तळमावल्याच्या काॅलेजमध्ये त्याकाळी ज्यांनी शिक्षण घेतले त्यांच्याविषयी 


मी माझ्या हृदयाचा एक कप्पा म्हणूनच सदैव करुणेने व्यापला आहे.


अशा विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यातील यशाच्या पताका पाहताना माझी छाती गर्वाने भरुन येते. अधिकराव कणसे प्रत्यक्ष माझे विद्यार्थी नव्हते पण ते मला जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा ‘नमस्ते गुरुदेव’ असे संबोधतात. ढेबेवाडी खोऱ्यातील अनेकजण जेव्हा असा गुरुदेवपदाचा सन्मान देतात तेव्हा या एकलव्यांना प्रणिपात करावासा वाटतो. कारण यांना तर आपण शिकवले नाही तरी ते आपणाला गुरु मानतात. एका शिक्षकाला यापेक्षा मोठी मानवंदना कुठली असू शकेल?


कणसेंची पहिली भेट झाली ती कडेपुरच्या आर्टस अॅण्ड काॅमर्स काॅलेजध्ये. मी प्राचार्य म्हणून 1990 च्या सप्टेंबरमध्ये तिथे हजर झालो. कणसे काॅमर्सकडे प्राध्यापक होते. हालअपेष्टा सोसून एम.काॅम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. प्राध्यापक म्हणून नेमणूकही मिळाली होती. पण त्यांचे भोग संपले नव्हते. 1984 साली विनाअनुदानित तत्वावर सुरु झालेल्या काॅलेजवर ते प्राध्यापक म्हणून काम पाहत होते. तुटपुंजी इमारत नावालाच ग्रंथालय, व्हरांडयाला तरटे लावून तयार केलेले क्लासरुम, तुटपुंजे विद्यार्थी आणि अल्प या शब्दालाही लाजविणारा अतिअल्प पगार. या अवस्थेत इतिहास विषयाचे प्राचार्य बी.बी.सावंत यांनी हा किल्ला धैर्याने लढविला होता. विद्यार्थ्यांच्या ईबीसी च्या येणाऱ्या रकमेवर सर्व स्टाफचा उदरनिर्वाहापुरताच मिळणारा पगार. तोही अनियमित, सुटीत गावाकडे जायचे म्हटले तर अॅडव्हान्स म्हणून मिळणारी रक्कम एस.टी.बसच्या भाडयाइतकीच मिळायची. प्राचार्य, प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची प्रचंड आर्थिक कोंडी व्हायची. सहा वर्षांनी 1990 साली मी जेव्हा तेथे प्राचार्य म्हणून गेलो तेव्हा महाविद्यालय पूर्ण अनुदानित तत्त्वावर आले होते. प्राध्यापकांनी आता पूर्ण पगार मिळेल या आशेने विश्वास सोडला होता. पण थोडयाच दिवसांत या आनंदाला ग्रहण लागले. शिक्षण सहसंचालकांनी कळविले होते की, मध्यंतरी दोन वर्ष कॉमर्स फॅकल्टीने किमान विद्यार्थी संख्येचे निकष पूर्ण न केल्याने त्यांना 100 टक्के अनुदान मिळणार नाही. झाले, एकाच शाखेवर एक सारखेच काम करणाऱ्या स्टाफवर आर्टसच्या प्राध्यापकांना पूर्ण पगार तर काॅमर्सच्या प्राध्यापकांना अर्धा पगार. कणसे काॅमर्सकडे होते. त्यांच्यासोबत के.एस.पाटील आणि व्ही.एम.पाटील हेही होते. पगार पत्रकावर सहया करताना माझ्या मनाची घालमेल व्हायची. या प्राध्यापकांविषयी माझ्या मनात करुणा दाटून यायची. तीच भावना आजतागायत मनात घर करुन बसली आहे.


प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्यांच्या वाढलेल्या पगारावर विखारी आसूड ओढणाऱ्यांना प्राध्यापकांना सुरुवातीला किती हाल अपेष्टा सहन केल्या याची पुसटशी तरी कल्पना आहे का? आजही हजारो प्राध्यापकांना तासिका तत्वावर नेमणूक देवून एखाद्या सामान्य मजूराइतकेही वेतन नाकारणाऱ्या शासनाविरुध्द आपला हाच आसूड उगारण्याचे धाडस या विद्वान उपटसुंभानी दाखवले आहे का?


आर्थिक तंगीत असणारा माणूस आपल्या कर्तव्यात बेफिकीरी दाखवितो. कणसेंनी ती कधीच दाखवली नाही. त्याकाळीही त्यांनी आपल्या कर्तव्यात कसर दाखवली नाही. माझ्या प्राचार्य पदाच्या कालावधीत प्राध्यापकांचे अनेक नमुने मी पाहिले आहेत. प्राध्यापकांच्या कामासंदर्भात शिक्षणक्षेत्रात ‘वर्कलोड’ हा शब्द का आला याचे जेव्हा मी चिंतन करतो. तेव्हा जाणवते की काहींना त्यांचे काम ‘लोड’च वाटते. तास सुरु होण्याची बेल वाजल्यावर आपले पुस्तक, खडू, डस्टर हया वस्तू शोधण्यात 10 मिनीटे वाया घावलणारे प्राध्यापक मी पाहिले आहेत. वर्गावर जातानादेखील त्यांची चाल इतकी संथ असायची की पाठीमागून त्यांना ढकलीत वर्गावर घेवून जाण्याची माझी इच्छा व्हायची. मला नेहमी वाटत आलंय की वर्गावर शिकवण्यासाठी जाणाऱ्या शिक्षकाने युध्दावर जाण्यासाठी आतुर असलेल्या योध्दयाप्रमाणे असावे. वर्गातून शिकवून बाहेर पडणाऱ्या शिक्षकाच्या चेहऱ्यावर विजयी योध्दयाचे समाधान असावे. आपले ज्ञान कधी एकदा विद्यार्थ्यांच्या मस्तका मध्ये घालतो याची आतुरता असावी आणि वर्गाबाहेर पडताना आपण त्यात यशस्वी झालो ही समाधानाची भावना दिसावी. काहींना आपण काय शिकवत आहोत ते त्यांचे त्यांनाच कळत नाही. त्यांचे विद्यार्थांना काय डोंबलं कळणार? शिकवण्यासाठीचा टाॅपिक स्वतः समजून घेण्यासाठी त्याचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. उद्या शिकविणारा विषय तयार करण्यासाठी आज आपण किती तास अभ्यास करतो याचा प्रत्येक प्राध्यापकाने विचार करण्याची गरज आहे. वर्षानवर्षं त्याच त्या नोटस वर्गात डिक्टेट करणारे अनेक प्राध्यापक मी पाहिले आहेत. असे प्राध्यापक शिकविण्यात काय आनंद असतो हे कसे जाणणार? आपण शिकवित असताना, विद्यार्थ्यांचे समाधानाचे आणि आनंदाचे फुलून येणारे चेहरे पाहतानाचा आनंद हा स्वर्गीय आनंद असतो. तो आनंद किती जण घेतात? एरव्ही शिकवणे म्हणजे पाटया टाकण्याचे काम होवून बसते आणि प्राध्यापक माथाडी बनतो. प्राध्यापक हा अज्ञानाचे उत्पादन करणारा घटक बनता कामा नये. डाॅ.बापूजी साळुंखे यांनी शिक्षकाला ‘विद्येचा उपासक’ असे संबोधले होते. कितीजण या संज्ञेला पात्र आहेत ? कणसे सरांनी भलेही पीएचडी सारख्या उच्च पदवीचे शेपूट प्राप्त केले नसेल पण उत्साही शिक्षकाचे आनंदी जीवन ते जगले. त्यांनी चार पुस्तके कमी वाचली असतील पण विद्यार्थ्यांची मने वाचण्यात ते तरबेज होते. माझ्याकडे किती ज्ञान आहे हे दाखवण्यापेक्षा विद्यार्थाला


 पचेल अशा भाषेत ज्ञान देणारा शिक्षक श्रेष्ठ असतो. आपण ग्रामीण भागातून आलो आहोत आणि ग्रामीण मुलांपुढे शिकवले पाहिजे ही जाणीव कणसे सरांच्यात होती. त्यामुळे ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यावेळच्या आपल्या आर्थिक संकटांची पुसटशी छटादेखील त्यांनी आपल्या शिकवण्याच्या कार्यात दिसू दिली नाही आणि कर्तव्यात कधी बेफिकीरी दाखवली नाही. आर्टसच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, सायन्सच्यांना मॅथॅमॅटिक्स जसे अवघड विषय वाटतात. तद्वत काॅमर्स विद्यार्थांना अकौटन्सी हा विषय अवघड वाटतो. विद्यार्थांना नापासाचे जास्तीत जास्त प्रमाण याच विषयात असते. कणसेंची गाठ या विषयाशी होती. त्यातही त्यांनी गोडी निर्माण केली.


एखादा प्राध्यापक विद्यार्थीप्रिय असला की प्राचार्य त्याच्यावर विश्वासाने अनेक जबाबदाऱ्या टाकतो. मी त्यांच्यावर काॅलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटची जबाबदारी टाकली. कोणतीही कुरकुर न करता, खोटया सबबी न सांगता त्यांनी ती उत्साहाने स्वीकारली आणि तितक्याच उत्साहाने पार पाडली. प्राध्यापकासाठी राष्ट्रीय सेवा योजना ही लिटमस टेस्ट असते. त्यात यशस्वी होणारा प्राध्यापक हा परिपूर्ण मानला जातो. कणसे त्यामध्ये उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांवर त्यांचा आदरयुक्त दरारा होता. कसलाही टारगट विद्यार्थी त्यांच्यापुढे नमायचा. कारण त्याला त्यांचा ग्रामीण हिसका माहित होता. शिस्तीबाबत त्यांची कधीच तडजोड नसायची. एरव्ही विद्यार्थ्यांच्या खांद्यावर हात टाकून मैत्रीचा सल्ला देवून मायेचा ओलावा निर्माण करण्यात ते तरबेज होते. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे ते क्रियाशील कार्यकर्ते होते. त्यावेही या संघटनेतर्फे त्यांनी बोर्ड आॅफ स्टडीजची निवडणूक लढविली होती आणि ते निवडूनही आले होते.


कडेपूरच्या अल्प सहवासानंतर आम्हा दोघांच्याही संस्थेत विविध ठिकाणी बदल्या होत गेल्या. पुन्हा आम्ही एकाच काॅलेजवर एकत्र आलो नाही पण त्यावेळी गुंफलेले ऋणानुबंधाचे धागे आजतक सैल झाले नाहीत. विविध कारणांनी आम्ही भेटतच राहिलो. मग तो कुणाकडचा लग्नसमारंभ असो अगर सेवागौरव समारंभ असो. एकदा तळमावल्याला काकासाहेब चव्हाण स्मृती दिन कार्यक्रमाच्यानिमित्ताने मी गेलो असताना ते तिथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता. त्याचे सर्व नियोजन प्रा.कणसेनी केले होते. तळमावले काॅलेजसारखा माजी विद्यार्थी संघ मी कुठल्याही काॅलेजमध्ये पाहिला नाही. मोठमोठया पदावर असलेले आणि सेवेतून निवृत्त झालेले माजी विद्यार्थी हमखास दरवर्षी 12 फेब्रुवारीला काॅलेजवर हजेरी लावतात. या विद्यार्थ्यांनी दरवर्षी लाखो रुपयांच्या देणग्या देवून काॅलेजला श्रीमंत केले आहे. काॅलेजला बदलून येणारा प्रत्येक प्राचार्य माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने मुंबईला एकतरी फेरी मारतो आणि देणगीरुपाने लाखो रुपये घेवून परत येतो. या विद्यार्थांना काॅलेज विषयी प्रचंड आत्मीयता आहे. माझ्या अनेक माजी विद्यार्थांची नावे मी नमूद करु शकतो पण जागेअभावी तो मोह मी टाळतो. अशा विद्यार्थ्यांच्या नावात अधिकराव कणसेचे नाव नक्कीच आहे. तळमावल्याला एखादा लग्नसमारंभ असो मी येणार असल्याची चाहूल लागली की कणसे तिथे हजर. कार्यक्रम संपल्यानंतर घरी येण्याचा आग्रह, मग तिथे पाहुणचार, गप्पागोष्टी हे अगदी ठरलेले. अगदी अलीकडे ते कराडच्या काॅलेजवर असताना व्याख्याना निमित्ताने माझे तिथे दोन तीन वेळा जाणे झाले. कुणीतरी तिथे समारंभात त्यांचा उपप्राचार्य म्हणून उल्लेख केला आणि मी हादरलो. काल परवापर्यंत अगदी वाटणारा हा मित्र आता सेवानिवृत्तीकडे झुकतोय याची जाणीव झाली आणि आता तर खरोखरच सेवानिवृत्त होतोय.


प्राध्यापक झाल्यानंतर आजतागायत कणसेनी आपल्या मातीशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. मी आणि माझी बायको मुले . एवढेच मर्यादित विश्व त्यांनी निर्माण होवू दिले नाही. आपले भाऊ-बहिणी यांना आपल्या संसारात सामावून घेतले. त्यांच्याकरता जेजे करता येईल ते ते केले आणि अजून करताहेत. त्यांच्या या कार्यात सौ.कणसे वहिनींचे योगदान मोठे आहे. त्यांनी सर्वांना आपले मानले आणि पडेल ते कष्ट आनंदाने सोसले. येणाऱ्या-जाणाऱ्यांचा पाहुणचार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यात सतत आपुलकीचा ओलावा ओसंडत असतो. माणसे जोडण्याची कला कुणाला शिकायची असेल तर या दांम्प्त्याकडून शिकावी. 


मिस्टर अधिकराव, आपले सेवानिवृत्ती पश्चात जीवन आनंदमय, सुखमय, आरोग्यमय होवो. आपल्या परिवारात सुख-शांती नांदो अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.


प्राचार्य : श्री.सुहास साळुंखे सातारा.