'स्पंदन’च्या वतीने कोरोनाविरुध्द लढणाऱ्या योद्यांना ‘सॅल्युट’...! 


'स्पंदन’च्या वतीने कोरोनाविरुध्द लढणाऱ्या योद्यांना ‘सॅल्युट’...! तळमावले/वार्ताहर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणारे डाॅक्टर, नर्सेस, पोलीस प्रशासन, अधिकारी, सफाई कामगार यांच्याबरोबर ग्रामीण विभागामध्ये पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी मदनीस इ.योध्दे अहोरात्र मेहनत घेत आहेत. हे सर्व लोक आपल्या कर्तव्यामध्ये कोणतीही कसूर न ठेवत असल्याचे दिसून येते. त्यांच्या कर्तृत्वाला, धैर्याला सलाम करण्यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने काळगांव विभागातील योद्यांना ‘कृतज्ञता सन्मानपत्र’ देण्यात येत आहे. सध्या प्रातिनिधिक स्वरुपात हे ‘कृतज्ञता सन्मानपत्र’ देण्यात आले असून उर्वरीत सन्मानपत्र लाॅकडाऊन संपल्यानंतर वितरित करण्यात येणार आहेत.  
‘‘आपले कुटूंब, आपल्या वैयक्तिक इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून आपण केवळ आमच्यासारख्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे निभवता आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या अमुल्य त्यागाची तुलना कशाचीही करता येणार नाही. आपण आमच्याकरिता करीत असलेल्या त्यागाची जाणीव ठेवावी तेवढी कमी आहे. म्हणून आपल्या या सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिश्ठतेसाठी आपणांस सलाम...!
आपण आपले बहुमोल योगदान देवून प्रशासनाला सहकार्य केले त्याबद्दल हे ‘कृतज्ञता सन्मानपत्र’ आपणास प्रदान करण्यात येत आहे. भविष्यात देखील आपणाकडून अशाच प्रकारे समाजसेवा घडेल अशी आशा आहे. आपल्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!’’
अशा आशयाचे ‘कृतज्ञता सन्मानपत्र’ ग्रामीण विभागामध्ये कोरोना विरुध्दच्या लढाईत सहभागी असलेल्या पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आषा स्वयंसेविका, अंगणवाडी मदनीस या योध्दयांचे मनोबल वाढवण्यासाठी, त्यांच्याप्रती आभार व्यक्त करण्यासाठी ‘कृतज्ञता सन्मानपत्र’ देण्यात आले आहे. स्पंदन ट्रस्ट एक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असलेली संस्था आहे. या संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम सातत्यपूर्वक राबवले जातात.
स्पंदन ट्रस्ट च्यावतीने यापूर्वी ढेबेवाडी विभागातील पोलीसांना मास्क वाटप, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीत लोकांनी मदत करावी यासाठी ‘एक कलाकृती कोरोनाविरुध्दच्या योद्यांसाठी’ असे स्तुत्य उपक्रम राबवले आहेत.
सदर आगळावेगळा उपक्रम राबवण्यासाठी ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ.रेष्मा डाकवे यांनी विशेष परिश्रम घेतले.