पोलीस पाटलांवर ‘शिवसमर्थ’चा मायेचा हात .


पोलीस पाटलांवर ‘शिवसमर्थ’चा मायेचा हात

तळमावले/संदीप डाकवे
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्यापासून प्रशासनाबरोबर पोलीस, इतर अधिकारी सक्षमपणे उभे आहेत. त्यांच्याबरोबर सातत्याने एक व्यक्ती निर्भिडपणे उभी आहे. त्याचे नाव पोलीस पाटील. रात्रंदिवस पोलीस पाटील कोरोनाविरुध्दच्या संघर्षात ठामपणे उभे आहेत. अशा या पोलीस पाटलांना तळमावले येथील शिवसमर्थ परिवाराने मायेचा हात फिरवला आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दैनंदिन जीवनात उपयुक्त असणारे जीवनावश्यक वस्तुंचे कीट देवून त्यांना सलाम केला आहे.
तळमावले येथील दि शिवसमर्थ मल्टी.को.आॅप.क्रे.सोसा.लि; व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने विभागातील सर्व पोलीस पाटलांना जीवनावश्यक कीटचे वाटप संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेचे उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे व सहकारी यांनी केले.
यापूर्वी संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाखाचा धनादेश दिला आहे. महिला बचत गटांकडून बनवलेले मास्क ग्रामीण भागातील वाडयावस्त्यांवर वाटले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी व्हिडीओ क्लिप, पत्रकारांसाठी जीवनावश्यक कीट इ. गोष्टींच्या माध्यमातून संस्थेने कोरोना विरुध्दच्या लढयात सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर शिवसमर्थ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 24 तास सेवा देण्याचाही प्रयत्न केला आहे.
तळमावले, ढेबेवाडी, कुंभारगांव या विभागातील सर्व एटीएम बंद असताना संस्थेने आपल्या एटीएमच्या माध्यमातून लोकांची होणारी गैरसोय थांबवली आहे. संस्थेच्या या विविध उपक्रमांचे जनमानसांत कौतुक होत आहे.
लोकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस पाटलांसाठी संस्थेच्यावतीने कीटचे वाटप करण्यात आले आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या बहुतेक सर्व वस्तूंचा समावेश या कीटमध्ये करण्यात आला आहे. अमित शिंदे, संतोष पवार, विजय सुतार, प्रवीण मोरे, निलेश सुपनेकर, सौ.मनिषा पवार, सौ.अमृता चोरगे, सौ.वंदना चाळके, सौ.सविता सपकाळ, नितीन पाटील, विशाल कोळेकर, अजय राऊत, अश्विनी भोसले व विभागातील पोलीस पाटील यांना हे कीट देण्यात आले. शिवसमर्थच्या या आपुलकीच्या वागणुकीमुळे सर्व पोलीस पाटील भारावून गेले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पोलीस आणि जनता यामधील दुवा पोलीस पाटील:
जनता आणि पोलीस यांच्यामधील दुवा बनण्याचे काम पोलीस पाटील करत आहेत. हे कौतुकास्पद आहे. त्यांनी अशाच पध्दतीने नेहमी काम करावे. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी देखील पुढे यावे. पोलीस पाटलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी शिवसमर्थ संस्था आणि परिवार यांच्या माध्यमातून फुल ना फुलाची पाकळी म्हणून जीवनावश्यक कीट दिले आहे. असे मत शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांनी व्यक्त केले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖