एक दिलदार व्यक्तिमत्व आप्पा. सेवानिवृत्त होताना....


एक दिलदार व्यक्तिमत्व आप्पा....


सेवानिवृत्त होताना....


जिद्द, चिकाटी, प्रचंड आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, खडतर परिश्रम या पंच सूत्रावर प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करून कमी शिक्षण असतानाही पानवळवाडी( मालदन) तालुका-पाटण यासारख्या छोट्या खेड्यातून मुंबई मध्ये जाऊन सुरुवातीस मिळेल ती खाजगी नोकरी करून नंतर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदावर मिळालेली संधी व त्या संधीचे अखंड परिश्रमातून केलेले सोने या जीवन प्रवासात नोकरी करत शिक्षण घेऊन पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणारा व सहकारात आपला ठसा उमटवणारा मुंबई बँक सेवक पतसंस्थे मध्ये व्हाईस चेअरमन पदापर्यंत काम करण्याची संधी मिळवणारा व कोऑपरेटिव्ह बँक एम्पलॉइज युनियन मुंबई लोकल कमिटीवर सन 2010 ते 2020 सलग दहा वर्ष सहखजिनदार पदी कार्यरत. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत येईल त्या संकटाला धैर्याने सामोरे जात वयाची साठ वर्षे पूर्ण करणारे व आपली मुंबई बँकेची 34 वर्षांची अखंड सेवा पूर्ण करून आज रविवार 31 मे 2020 रोजी सेवानिवृत्त होणारे आमचे प्रेरणास्थान म्हणजे पानवळवाडी मालदन तालुका पाटण गावचे सुपुत्र दिनकर गोविंद चव्हाण ( आप्पा.).


 हे आज आपल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ कार्यानंतर 31 मे 2020 रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन प्रवासाचा थोडक्यात घेतलेला आढावा.


दिनकर चव्हाण यांना सर्वजण आप्पा या नावाने संबोधत मितभाषी पण तितकाच करारी बाणा रागिट स्वभावाचा पैलू जरी असला तरी तितकाच प्रेमळ स्वभाव. "अरे ला कारे" तर प्रेमाला प्रेमाने जिंकणारे, दोस्तीला दोस्ती पर्व जपणारे, कुशल संघटक मैत्रीची अमर्याद साखळी निर्माण करणारे व्यक्तिमत्व. संकटात मदतीला धावून येऊन दोस्ती जपणारे, निभावणारे म्हणजे आप्पा.


जीवनात अनेक मित्र असतात यातील काही जणच प्रेरणास्थानी असतात त्या माझ्या प्रेरणास्थाना मध्ये आप्पांचा नंबर वरच्या क्रमांकावर लागतो. काहींना त्याचा स्वभाव पटत नसेल पण स्पष्ट बोलणे हा त्यांचा स्वभाव गुणधर्म. सडेतोड भूमिका मांडणारे, स्पष्टवक्ती व्यक्तिमत्त्व असणाऱ्या या माणसाचा जन्म पानवळवाडी मालदन, तालुका पाटण जिल्हा सातारा येथे 1 जून 1960 रोजी झाला. घरची परिस्थिती बेताचीच कमी वयातच मातृ-पितृ छत्र हरपले. त्यामुळे शिक्षणाची हेळसांड झाली. पोटाची खळगी भरण्यासाठी इतर चाकरमान्यां प्रमाणे कमी वयात मुंबईला आले . कमी वयात मातृ-पितृ छत्र हरपले त्यामुळे सातवीपर्यंत गावी शिक्षण झाले व शिक्षण अर्धवट सोडुन कामानिमित्त त्यांनी मुंबईची वाट धरली. त्यांची मोठी बहीण सौ. यशोदा माटेकर यांनी 1980 मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी मुंबई येथे त्यांच्या घरी नेले. व तिथे इयत्ता आठवी मध्ये शाळेत दाखल केले. पण त्यावेळची परिस्थिती फक्त शिक्षण घेण्यासारखी नव्हती त्यांनीच ओळखीने प्रायव्हेट नोकरी लावली जेमतेम शिक्षण असल्याने मार्केटमध्ये कष्टाच्या कामाची नोकरी मिळाली. कष्टाची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. जिद्द, चिकाटी व परिश्रमाची सवय असल्याने हे कष्टाचे काम ही प्रामाणिकपणे केले. प्रामाणिकपणातूनच नशिबाचा दरवाजा उघडत असतो. त्याप्रमाणे त्यांना थोरले भाऊ शंकराव यांच्या मदतीने त्यावेळेचे कुंभारगाव येथील अशोक गजरे मुंबई बँकेचे संचालक होते. त्यांच्या सहकार्याने सन 1986 साली मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई या पदावर नोकरी मिळाली. तब्बल सहा वर्षे मुंबईत मिळेल ते कष्टाचे काम केले व त्यानंतर नशिबाने साथ दिली. व बँकेची नोकरी मिळाली खडतर कष्ट करण्याची सवय असल्याने नोकरी करत बाह्य शिक्षणाद्वारे शिक्षण घेत ग्रॅज्युएशन केले. खरोखर या जिद्दीचे व परिश्रमाचे कौतुक केले पाहिजे. बँकेतल्या नोकरीनंतर या माणसाने आपल्या प्रचंड इच्छाशक्ती व परिश्रमाच्या जोरावर मागे न पाहता प्रगतीचा आलेख वाढवत नेला. मुंबईमध्ये स्वतःचे घर घेतले व जीवनाला स्थिरता मिळाली. उत्तम संघटन कौशल्य त्यामुळे बँकेच्या कामाबरोबर सहकारात ही काम करण्याची संधी मिळाली व तिथेही बँकेच्या सेवक पतपेढीत व्हॉइस चेअरमन पदापर्यंत काम करण्याची संधी प्राप्त झाली. व त्या पदाला ही न्याय देण्यात ते प्रभावी ठरले. व यशस्वी झाले.


प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते. त्याप्रमाणे त्यांची पत्नी साधना (माई) त्यांच्या खडतर प्रवासात सावलीप्रमाणे उभी राहिली व कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे हाकला. सुखी व संस्कारक्षम कुटुंब उभे केले. त्यांची दोन मुले निखिल व अक्षय संस्काराची दोन पाने आहेत. एक ' दि सातारा सहकारी बँक लिमिटेड ' मुंबई या बँकेत चांगल्या पदावर कार्यरत आहे. तर दुसराही प्रायव्हेट मध्ये नोकरीस आहे तर सून सुद्धा ' दि सातारा सहकारी बँक लिमिटेड' मुंबई या बँकेत नोकरीस आहे. असे सुखी व संस्कारक्षम कुटुंब घडवणारे दिनकर चव्हाण उर्फ आप्पा यांना त्यांच्या सेवानिवृत्ती नंतर चा काळ आनंदात जावो भावी आयुष्य निरोगी राहो हीच सदिच्छा.


माझा परिवार व दैनिक कृष्णाकाठ व कृष्णाकाठ न्यूज चॅनल च्या वतीने आप्पांना सेवानिवृत्तीनंतर च्या कार्यास व भावी वाटचालीस उदंड शुभेच्छा.


चंद्रकांत चव्हाण.


संपादक: दैनिक कृष्णाकाठ व कृष्णाकाठ न्यूज चॅनेल कराड.