दुसऱ्या राज्यातून आणि इतर  जिल्ह्यातून येणाऱ्या जिल्हावासियांच्या विलगीकरणासाठी नियोजन सुरु - पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील.


दुसऱ्या राज्यातून आणि इतर  जिल्ह्यातून येणाऱ्या जिल्हावासियांच्या विलगीकरणासाठी नियोजन सुरु
- पालकमंत्री बाळासाहेब पाटील
  सातारा दि. 11 (जिमाका) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील नागरिक विविध कारणांमुळे बाहेरच्या जिल्ह्यात अडकून पडले आहेत. हे नागरिक जिल्ह्यात आल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्याबाबतचे नियोजन जिल्हा प्रशासन करीत आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली.
 कोरोना संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार  पृथ्वीराज चव्हाण, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते. 
 कोरोनाचा कराड मध्ये प्रादुर्भाव वाढत आहे, ही प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, या आजारावर खात्रीशीर असे औषध नाही, सुरक्षित अंतर ठेवणे हाच  यावर उपाय आहे. सामजिक दायीत्व म्हणून विविध संस्था अन्नधान्य वाटप करीत आहेत. शासनाने शिवभोजन केंद्राची व थाळींची संख्या वाढवली असून ही थाळी अवघ्या 5 रुपयांमध्ये गरजुंना उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
 मुंबई-पुण्याहून आलेल्या नागरिकांची संख्या प्रशासनाकडे आहे. पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना  विलगीकरण कसे करता येईल यासाठी जिल्हा प्रशासन काम करीत आहे. तसेच परराज्यातील नागरिकांची नोंदणी सुरु असून राज्यांनी होकार दिल्यानंतर रेल्वेही सोडण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
 आपल्या जिल्ह्यातील लोक परराज्यात अडकलेले आहे, त्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना करुन खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, लोकप्रनिधींना माहिती होण्यासाठी 24 तास कॉलसेंटर सुरु करा. कोरोना संदर्भात नगर सेवकांना, सरपंचांना, पोलीस पाटलांना विश्वासत घेऊन काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी आपापसात समन्वय ठेवावा. जे बाहेर जिल्ह्यातून नागरिक येणार आहेत त्यांचे  विलगीकरण करताना गावाला विश्वासत घेवून करावे. तसेच जिल्ह्यात प्रवेश देताना अतिशय काटेकोरपणे नियमाची अंमलबजावणी व्हावी. जिल्ह्यातील मोठे हॉटेलही विलगीकरणासाठी उपलब्ध करुन द्यावेत, ज्याची ऐपत असेल अशी लोकं तिथे राहतील अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.तसेच निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे यंत्रणा उभी केली जाते तशा प्रकारची यंत्रणा उभी केल्यास विलगीकरण केलेल्या नागरिकांवर सहजपणे लक्ष ठेवता येईल व त्यांना वेळेत उपचार केले जातील यासह अनेक सूचना यावेळी उपस्थित खासदारांसह आमादारांनी केल्या.
   


Popular posts
मंत्री शंभूराज देसाई यांची उद्या दौलतनगर येथे सभा. शक्ती प्रदर्शनाकडे जिल्ह्याचे लक्ष
इमेज
"आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव" पुरस्काराने मान्याचीवाडीचा गौरव ; मान्याचीवाडी ठरले जिल्हयातील स्मार्टग्राम.
इमेज
विनायक मेटे यांचा कार अपघातात अकाली मृत्यू! मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. सरपंच सौ. सारिका पाटणकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न.
इमेज
कुंभारगाव येथे "हर घर तिरंगा "रॅली संपन्न.
इमेज