कराड मध्ये आज नवे 8 पॉझिटिव्ह ...


कराड : कराड तालुक्यात पसरलेले कोरोनाचे लोण आता कराडमध्येही पोचले आले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयातील पाच आरोग्य सेविका आणि एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक अहवाल काल  रात्री उशिरा आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर येथील एक महिला आणि मलकापूर-  आगाशिवनगरमधील एका पुरूषालाही बाधा झाली आहे. त्यामुळे कराड तालुक्यात नवे आठ रुग्ण कोरोना बाधित म्हणून समोर आले असून तालुक्यातील बाधितांची संख्या 40 झाली आहे. सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या 52 इतकी झाली आहे. 


कराड तालुका हा कोरोनासाठी हॉटस्पॉटच बनला आहे. एकट्या कराड तालुक्यात तब्बल 40 रुग्ण कोरोना बाधित म्हणून सापडले आहेत. कराड तालुक्यात बाबरमाचीपासून सुरू झालेली साखळी ब्रेक होण्यास तयार नाही. त्यामुळे बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मलकापूर- आगाशिवनगर व वनवासमाची येथील सर्वाधिक रुग्ण या साखळीतून कोराेनाबाधित झाल्याचे आरोग्य विभागाच्या यापूर्वीच्या अहवालावरून समोर आले आहे.


सहा दिवसापूर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात एका महिलेची प्रसूती झाली. तिच्या घशातील स्रावाचाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तीन दिवसानंतर संबंधित महिलेचा अहवाल कोरोना बाधित म्हणून आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित महिलेच्या प्रसुतीसाठी कार्यरत असणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी धास्तावले होते.


संबंधिताचीही तपासणी आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आली. यामध्ये काल (गुरुवारी) रात्री उशिरा संबंधित तपासणीचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले. यामध्ये येथील उपजिल्हा रुग्णालयातील पाच महिला आरोग्य सेविका सह अन्य एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे संबंधित कर्मचाऱ्यांकडून गेल्या काही दिवसात किती जणांची आरोग्याच्या संबंधाने संपर्क आला आहे याची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. या कर्मचार्‍यांसह येथील रुक्मिणी गार्डन मधील एका महिलेसह आगाशिवनगर मधील एकाचा नव्याने समावेश झाला आहे.


त्यामुळे कराडला एकाच दिवशी तब्बल आठ कोरना बाधित सापडले असून कराड तालुक्यातील बधितांची संख्या 40 वर पोहोचली आहे. कराड तालुक्यात संख्या सर्वाधिक असल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले आहे.