धक्काबुक्की झालेल्या “त्या ” पोलिस अधिकाऱ्याला गृहराज्यमंत्र्यांचा फोन. डगमगू नको, राज्याचा गृहराज्यमंत्री तुझ्या पाठीशी आहे.


पाटण दि.13 :- म्हसवड जि.सातारा येथील पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जावून धक्काबुक्की केल्याची घटना राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या कानावर गेली. ही घटना कानावर जाताच त्यांनी तात्काळ जिल्हा पोलिस अधीक्षकांना फोन करुन संबधित पोलिस अधिकाऱ्यांला धक्काबुक्की करणाऱ्या आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करुन त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करा असे सक्त आदेश दिले.पोलिस अधीक्षकांचा फोन ठेवताच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी धक्काबुक्की झालेल्या अमोल कदम या  पोलिस  अधिकाऱ्याला फोन लावला आणि अमोल,डगमगू नकोस, राज्याचा गृहराज्यमंत्री तुझ्या पाठीशी आहे,घडलेली घटना माझे कानावर आली आहे.मी वरीष्ठांशी बोललो आहे. कर्तव्य बजावित असताना कुणीही असो वर्दीवर हात टाकलेला सहन केला जाणार नाही असा दिलासा त्यांनी “त्या” पोलिस अधिकाऱ्याला दिला आणि काळजी घे असेही त्यांनी “त्या” पोलिस अधिकाऱ्याला सांगितले.


              सातारा जिल्हयातील म्हसवड येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरीता लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्ताच्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावित असताना म्हसवड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम या पोलिस अधिकाऱ्यास अर्वाच्च भाषेत बोलत दमदाटी करुन त्या पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर म्हसवड येथील एक पदाधिकारी धावून गेला व त्या आरोपी पदाधिकाऱ्याने शासकीय कामात अडथळा निर्माण करुन अमोल कदम या पोलिस उपनिरीक्षकांस धक्काबुक्कीही केली असल्याची घटना दोन दिवसापुर्वी म्हसवड येथे घडली. घडलेली ही घटना राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या कानावर गेली असता त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ जिल्हा पोलिस अधिक्षकांना फोन केला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करीत पोलिस उपनिरीक्षकाच्या अंगावर धावून गेलेल्या त्या आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करा आणि कडक कायदेशीर कारवाई करा.कोणीही किती मोठा असला तरी शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आणि कर्तव्य बजावित असताना वर्दीवर हात टाकणाऱ्यांची गय केली जाणार नाही.पोलिसांनी तर अशांची अजिबात गय करु नये तात्काळ दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करा असे ना.शंभूराज देसाईंनी सांगितलेनंतर पोलिस उपनिरीक्षकाला धक्का बुक्की करणाऱ्या त्या आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर पुढील कडक कायदेशीर कारवाई करण्याचे काम पोलिस यंत्रणेकडून सुरु आहे.


           राज्याच्या गृहराज्यमंत्री या नात्याने आपल्या विभागाच्या एका अधिकाऱ्याला शिवीगाळ होते,त्या अधिकाऱ्याच्या अंगावर जावून त्यास धक्काबुक्की होते हा प्रकार चुकीचा असून अशांना धडा शिकविण्याचे काम गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केलेच आहे त्याचबरोबर ज्या पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की झाली त्या पोलीस अधिकाऱ्याला आपण राज्याचा गृहराज्यमंत्री आहे हा अविर्भाव न बाळगता त्यांनी स्वत: त्यास फोन केला आणि आपलुकीने “त्या” अधिकाऱ्याची चौकशी करीत डगमगू नकोस, राज्याचा गृहराज्यमंत्री तुझ्या पाठीशी ठाम उभा आहे असा दिलासा देत माणूसकीही जपण्याचे काम गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले.