5 हजारा पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती क्षेत्रात दुकान उघडण्यासाठी विषम तारखा,  अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी


5 हजारा पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती क्षेत्रात दुकान उघडण्यासाठी विषम तारखा,  अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी


सातारा दि. 14 (जिमाका) : लॉकडाऊन मध्ये शिथीलता दिल्यानंतर सर्व आस्थापना उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु, बहुतांश नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे व बाजारपेठेत अनावश्यक गर्दी होत असल्याने कोरोना विषाणुचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रामध्ये दुकान उघडण्यासाठी विषम तारखा दिल्या आहेत.या  प्रतिबंधात्मक अंमलबजावणीचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत.


       हे आदेश सातारा तालुक्यातील लिंब, खेड, शाहुपूरी, कोडोली, संभाजीनगर, देगाव, नागठाणे, अतित, काशिळ. कोरेगाव तालुक्यातील कुमठे, पाडळी स्टेशन, पिंपोडे बु, वाठार (किरोली), वाठार स्टेशन. माण तालुक्यातील पळशी, गोंदवले बु, बिदाल. फलटण तालुक्यातील आसू, विडणी, कोळकी, गुणवरे, बरड, गिरवी, सांगवी, पाडेगाव, तरडगाव, साखरवाडी (पिंपळवाडी). खंडाळा तालुक्यातील शिरवळ. वाई तालुक्यातील बावधन, भुईंज, ओझर्डे, पसरणी, यशवंतनगर. जावली तालुक्यातील कुडाळ. कराड तालुक्यातील आटके, ओंड, उंब्रज, बनवडी, चरेगाव, गोळेश्वर, काले, कार्वे, विंग, कोपर्डे हवेली, मसूर, मुंढे, पाल, रेठरे बु, सदाशिवगड, सैदापूर, शेरे, तांबवे, वडगाव हवेली, वारुंजी. खटाव तालुक्यातील बुध, खटाव, पुसेगाव, चितळी, मायणी, कलेढोण, कुरोली (सिद्धेश्वर), निमसोड, पुसेसावळी, औंध व पाटण तालुक्यातील तारळे या 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना लागू राहील.


या आदेशानुसार वरील ग्रामपंचायत हद्दीतील हॉस्पीटल्स, नर्सिग होम व खासगी डॉक्टरचे क्लिनिक (ओपीडी) 24 तास सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील किरणा दुकाने, औषधांची दुकाने (मेडिकल) शेती संबंधी औषधांची दुकाने, खते व बी-बियाणांची दुकाने दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच सुरु ठेवावीत.  उर्वरित सर्व प्रकारच्या आस्थापना, दुकाने केवळ विषम तारेखस सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेतच चालू राहतील. ग्रामपंचायत हद्दीतील मद्यविक्री जिल्हाधिकारी, सातारा यांच्याकडील आदेशातील अटींच्या अधीन राहून सुरु ठेवण्यास मुभा राहील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्यात येऊन संबंधिताचा परवाना तात्काळ कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल. तसेच या ओदशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावरुद्ध साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897, दंड प्रक्रिया संहिता, 1973, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.