1मे “गुलमोहर डे”


 


गुलमोहर  – 1मे “गुलमोहर डे” निमित्ताने....!


      वैशाख वणव्यात सारी सृष्टी उन्हाच्या कडाक्याने पोळून निघत असताना लाल-केशरी फुलांनी  गुलमोहर बहरून येतो.  फुलांनी नखशिखांत डवरून वार्यााच्या झुळकीबरोबर एकेक फूल जमिनीवर येते तेव्हा तांबड्या पाकळ्यांचा गालिचा मनाला अपार सुख देवून जातो. 


        गुलमोहर हा उष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष. याला इंग्लिशमध्ये मे फ्लॉवर ट्री असेही नाव आहे. हा मूळचा मादागास्करचा. आपल्या देशात गुलमोहराचे झाड सर्व प्रथम मुंबईत शिवडी येथे आढळल्याचा उल्लेख एस.एम.एडवर्ड्‌स या शास्त्रज्ञाने १८४० साली तयार केलेल्या गॅझेटर ऑफ बॉम्बे सिटी ॲन्ड आयलंड या वनस्पती-सूचित नमूद केला आहे.


       आपल्या देशात ' गुलमोहर डे ' साजरा करणारे सातारा हे बहुधा पहिलेच शहर असावे. १९९९ सालापासून साताऱ्यात हा दिवस साजरा केला जातो. साताऱ्याच्या पोवई नाक्याजवळ गुलमोहराची बरीच झाडे आहेत. त्यामुळे या रस्त्याला गुलमोहरचा रस्ता म्हणून ओळखतात.  या रस्त्यावर विविध उपक्रम घेवून  'गुलमोहर डे” साजरा केला जातो. गुलमोहराला अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील मायामी इथे विशेष स्थान आहे. दरवर्षी गुलमोहर बहरात येण्याच्या काळात इथे वार्षिक 'गुलमोहर फेस्टिव्हल'चे आयोजन केले जाते.  


        माझ्या शाळेच्या परिसरात अशी बरीच गुलमोहराची झाडे आहेत. त्यातील सर्वांगाने फुलणारे आणि सर्वात जुने झाड गेल्या वर्षीच्या पावसाने उन्मळून पडले. मनाला वाईट वाटले, पण हे झाड यापूर्वी अनेक वेळा कॅमेर्‍यात कायमचे बद्ध केले असल्याने दुसरी समाधानाची बाजू होती.


       आज 1 मे च्या निमित्ताने त्याची शेवटची आठवण.  पण त्याने शिशिर ऋतूची सारी उदासवाणी वृत्ती बाजूला सारत चैतन्याची ईश्वरी किमया दाखवली. जीवनातील नव्या आवाहनाला सामोरे जाण्याची दृष्टी निर्माण केली. आणि अडचणीत असताना जगण्याचे बळ निर्माण केले. 


( प्रदीप रवलेकर, कराड )