सह्याद्री साखर कारखान्यात हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती.


कराड / प्रतिनिधी
काटकसरीचे धोरण अवलंबून ऊस उत्पादक सभासदांना जास्तीत जास्त फायदा करून देण्याचा पॅटर्न अवलंबणाऱया आणि राज्याचे सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱया यशवंतनगर (ता. कराड) येथील सहय़ाद्रि सहकारी साखर कारखान्यानेही हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती ‘ना नफा, ना तोटा' तत्वावर सुरू केली आहे. याची किंमत सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात सर्वसामान्यांना परवडेल, अशी ठेवली आहे. 30, 50, 75, 100 व 500 रूपयांत हॅण्ड सॅनिटायझर कारखान्याने उपलब्ध केले आहेत.
राज्यात कोरोनाचे संकट आल्यानंतर सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला. बाजारात उपलब्ध असणाऱया सॅनिटायझरची काळय़ा बाजाराने विक्री होऊ लागली. त्यामुळे शासनाने सहकारी साखर कारखान्यांना हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती करण्याची सूचना केली होती. त्यामुळे राज्यातील सुमारे 43 सहकारी साखर कारखान्यांनी हॅण्ड सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले आहे. सहय़ाद्रि साखर कारखान्यानेही सॅनिटायझर निर्मिती सुरू केली आहे. याची किंमत उत्पादन खर्चावर आधारित ठेवली आहे. अतिशय माफक दरात सहय़ाद्रिने सॅनिटायझरची किंमत सर्व करांसहीत ठेवली आहे. 100 मिली सॅनिटायझरची किंमत 30 रूपये, 200 मिलीची 50 रूपये, 500 मिलीची 75 रूपये, 1 लीटरची 100 रूपये व 5 लीटरची किंमत 500 रूपये ठेवली आहे.  
 नामदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, कारखान्याने सर्वसामान्यांना परवडेल, अशा किमतीत हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध केले आहेत. ते कारखाना, गट ऑफिस तसेच ग्रामीण भागात सरपंच, ग्रामसेवकांनी पत्र दिल्यानंतर त्याच किमतीत सॅनिटायझर देण्यात येणार आहेत. नगरपालिकेने मागणी केल्यानंतर त्यांनाही उपलध्ब केले जातील. हॉस्पिटलनाही उपलब्ध करण्यात येतील. सर्वसामान्य जनतेला सॅनिटायझर उपलब्ध व्हावेत, या हेतुने माफक दर ठेवला आहे. सॅनिटायझरची किंमत बाजारात 100 रूपयांपासून पुढे असताना सहय़ाद्रि कारखान्याने माफक किमतीत ते उपलब्ध केले आहेत.