पाटणमध्ये शिवभोजन थाळीचा प्रारंभ .


पाटण, दि. 5 : राज्य शासनाने 1 जानेवारी 2020 पासून हातावर पोट असलेल्या तसेच मोलमजुरी करणार्‍या गोरगरीब,गरजूंना कमी पैशात चांगले जेवण मिळावे यासाठी सुरू केलेल्या शिवभोजन थाळी योजनेला पाटण शहरात चांगला प्रतिसाद मिळत असून समाधान व्यक्त केले जात आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाटणमधील नवीन बसस्थानकातील एसटी कॅटीन, जूना स्टँडवरील त्रिमूर्ती हॉटेल आणि तहसील कार्यालयानजीक असलेल्या हॉटेलमध्ये शिवभोजन थाळी योजना सुरू झाली आहे. प्रत्येक शिवभोजन थाळी केंद्रातून दररोज सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत 5 रुपयात दोन चपाती,भाजी,भात,वरण असा आहार असलेल्या 50 शिवभोजन थाळ्या प्रत्येक केंद्रातून देण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या लाँकडाऊन आणि जमावबंदी आदेशामुळे हातावर पोट असलेल्या तसेच मोलमजुरी करणार्‍या गोरगरीब लोकांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांच्या पोटापाण्यासाठी सुरुवातीला 10 रुपयांंत असणारी शिवभोजन थाळी गोरगरिबांना आता केवळ 5 रुपयांंत उपलब्ध करून देण्यात आल्याने लोकांमधूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.