चोरट्या दारूचं लोकेशन कळवा : गृहराज्यमंत्री ना: शंभूराज देसाई.


ढेबेवाडी (सातारा) : 'उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीसांकडून कारवाईचा धडाका सुरू असतानाही बंद काळात चोरट्या मार्गाने येणाऱ्या दारूची उगमस्थाने शोधून त्याची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. यामध्ये कुणालाही 'सुट्टी' नाही, असे गृह व उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. या संदर्भात तात्काळ कारवाईसाठी मला मोबाईलवर माहिती द्या, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.
   म्हणाले,'सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद काळात देशी-विदेशी दारूची दुकाने, बार, परमीट रूमना सील लावलेले असतानाही चोरट्या पद्धतीने दारू वाहतूक व विक्रीचे प्रकार समोर येत असल्याने पोलीस व उत्पादन शुल्कला अधिक सतर्कतेच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यांच्या गुप्तचर यंत्रणेलाही मुळाशी जावून माहिती काढण्यास सांगितलेले आहे. आधिकारी-कर्मचारी कमी आणि कामाचा व्याप व कार्यक्षेत्र जास्त अशी उत्पादन शुल्क विभागाची स्थिती आहे. पोलिसांच्या तुलनेत त्यांच्याकडे दहा टक्केही मनुष्यबळ आणि सुविधाही नाहीत. तरीही याप्रश्नी त्यांना सक्त सूचना देवून कामाला लावलेले आहे. ऑफिसमध्ये बसून न राहता फिल्ड वर्कवर भर देण्यास सांगितले आहे. अवैध दारूचा साठा, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आलेली असून पुढेही ही मोहीम सुरूच राहणार आहे. जिल्हा हद्दी सील केल्या असताना दारू कुठून येतेय, याचा मुळाशी जावून शोध घेतला जात आहे. बंदी उठल्यानंतर दुकानांना लावलेली सील पंचांसमक्ष काढली जाणार आहेत. त्यामध्ये काही भानगडी केलेल्या दिसून आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. यामध्ये नियम आणि कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास जबाबदार असलेल्या कुणालाही सुट्टी नाही हे संबंधितांनी लक्षात घ्यावे. यामध्ये जागरूक नागरिकांची भूमिकाही खुपच महत्वाची असून त्यांनी असे गैरप्रकार कुठे निदर्शनास आल्यास त्याबाबत खात्री झाल्यावर माझ्याशी मोबाईलवरून संपर्क साधावा, संबंधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल. यामध्ये माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवले जाईल.त्यांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही', असे त्यांनी म्हटले आहे. 
 
गृह, उत्पादन शुल्कसह विविध खात्यांचा कार्यभार असलेल्या शंभूराज देसाई यांच्यावर वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाशीममधील जबाबदार अधिकाऱ्यांच्या मी सतत संपर्कात असून तेथे यंत्रणेने चांगल्या पद्धतीने परस्थिती हाताळली आहे.  कोरोनाच्या संदर्भात राबवलेल्या प्रभावी उपाययोजनांचा वाशीम पॅटर्न अन्य जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.