सुरेखा पुणेकर...........!! माझ्या अनेक आठवणीतील एक साठवणूक....!!


सुरेखा पुणेकर...........!!
माझ्या अनेक आठवणीतील एक साठवणूक....!!


        सुरेखा पुणेकर....!!नृत्य-गायन व अदाकारी यांचा "त्रिवेणी संगम".... असलेल्या  एक महान कलाकार.त्यांना भेटण्याचा योग १९९९ साली कोल्हापुरात आला. तेव्हा मी शिवाजी विद्यापीठात” एम. फिल." करत होतो. आणि नुकतचं "सुरेखा पुणेकर "यांचे नाव "लावणीसम्राज्ञी" म्हणून नावारूपाला येऊ लागलं होतं. मी तेव्हा बेळगाव" तरुण भारत " मध्ये शिक्षण घेत लेखन करत होतो. 
        सकाळी अकरा वाजले असतील, माझ्या जाण्याच्या रस्त्यावरच  नगरपालिकेचे सांस्कृतिक सभागृह आहे. तिथे संध्याकाळी पुणेकरांच्या लावणीचा कार्यक्रम होता. त्यांच्या गाड्या सकाळीच आल्या होत्या. आपल्यालाही काहीतरी स्टोरी मिळेल म्हणून त्यांच्या गाड्या बघून मी आत गेलो. सहज चौकशी केली तर त्यांनीही लगेचच वेळ दिला. त्यांनी कुणाला तरी चहा व  खुर्च्या आणायला सांगितल्या. दोन लोखंडी खुर्च्यावर समोरासमोर बसलो. आणि त्यांनी इथपर्यंतचा आपला जीवनप्रवास सांगायला सुरुवात केली.


   त्या जेव्हा  नऊ वर्षाच्या होत्या तेव्हा पासून त्यांच्या पायात चाळ आले. आई-वडील, बहिणी या सगळ्यांचा मिळून तमाशा. गावोगाव फिरायचं आणि तमाशा करायचा. अगदी चवली- पावली पासून झालेली कलेची सुरुवात. गावातून गोळा झालेलं अन्न खाऊन त्यांनी तमाशा केले. या तमाशातून त्यांना बरेच चांगले- वाईट अनुभव प्रत्ययाला आले. स्टेजवर नाचताना मारले जाणारे खडे, लेजर लाइट्स, फडावर झालेले हल्ले, जीव आणि अब्रू वाचवण्यासाठी केलेली धडपड.. अशा एक ना अनेक घटना त्यांनी  सांगताना मलाही गहिवरून आलं होतं. किती प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी नाव कमावलेल होत ह्याच प्रत्यंतर मला त्यावेळी नि अजूनही येत.


        मी त्यांची भेट आटोपून थेट लायब्ररीत गेलो. वाचायला सुरुवात केली, पण लिंक काही केल्या लागेना. त्यांचा चेहरा नजरे समोरुन हलेना. त्यांच्या जीवनाची "करुण कहाणी" कुठेतरी सलत मनाला यातना देत होती. पुस्तकात त्यांचाच चेहरा दिसायला लागला. नाईलाजाने अभ्यास सोडला. घर गाठले. पहाटे लवकर जाग आली, आणि सुरेखा पुणेकरांची कहानी  कागदावर आली. पुढे ती छापून आली. बरीच प्रसिद्धी मिळाली. अनेकांनी कौतुक केलं. पण त्या वेळेचा त्यांचा चेहरा आजही एवढ्या वर्षानंतर आहे तसाच नजरेसमोर येतो. आणि अपार सौंदर्याच्या आड दडलेली करुण कहाणी नजरेसमोर उभी राहते.


प्रदीप रवलेकर , कराड