गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.


गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.


कराड दि.२१ : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर व लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर उभे राहून १४ ते १६ तास आपले कर्तव्य बजाविणाऱ्या कोल्हापुर परिक्षेत्रातील कोल्हापुर,सोलापुर,सांगली,सातारा व पुणे जिल्हयातील सर्व पोलीस विभागांचा आढावा आज राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला.पालघरसारखी घटना घडू नये याची खबरदारी कोल्हापुर परिक्षेत्रातील सर्वांनी घ्यावी.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर व लॉकडाऊनच्या काळात सर्व पोलीस यंत्रणेचे उत्कृष्ट काम सुरु असून कोल्हापुर परिक्षेत्रामध्ये  आपल्या सर्वांच्या नियत्रणांखाली काम करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी,कर्मचारी हे जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अश्या सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांना देवून माझा हा संदेश तळागाळातल्या पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत पोहचवा असेही त्यांनी यावेळी सांगितले.


          सातारा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली  कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व कोल्हापुर,सोलापुर, सांगली, सातारा  व पुणे जिल्हयातील पोलीस अधीक्षक यांची व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजीत केली होती. यावेळी ना.देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे या पाच जिल्हयातील कोरोनाच्या व लॉकडाऊनच्या परिस्थितीचा आढावा घेतला.


            प्रारंभी ना.शंभूराज देसाईंनी जिल्हानिहाय संबधित जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांचेकडून पोलीस यंत्रणांचा आढावा घेतला व कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना आतापर्यंत या पाच जिल्हयामध्ये ज्याप्रमाणे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहणेकरीता आपण सर्वांनी खबरदारी घेतली आहे त्याचप्रमाणे पुढील काळातही खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या.पालघरसारखी एखादी घटना कोल्हापुर परिक्षेत्रातील एखादया जिल्हयात घडू नये याचीही विशेष खबरदारी सर्वांनी घ्यावी. असे सांगत कोणत्या जिल्हयामध्ये किती कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत आता जिल्हयामध्ये कोरोना तसेच लॉकडाऊनच्या संदर्भात काय परिस्थिती आहे?कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणणे करीता पोलीस यंत्रणेकडून कोणकोणत्या उपाययोजना तसेच प्रतिबंध करण्यात आले आहेत यामध्ये कोणत्या अडचणी पोलीस विभागाला येत नाहीत ना ? कोणकोणत्या जिल्हयामध्ये किती ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे बंदोबस्ता करीता पुरेसे पोलीस बळ आपल्या सर्वांच्या जवळ आहे काय? होमगार्ड तसेच एसआरपीच्या तुकडया आहेत का? आपल्या जिल्हयामधील पोलीस यंत्रणा किती किती तास आपले कर्तव्य बजावित आहेत त्यांना कोणती अडचण तर येत नाही ना? याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी यावेळी घेतली व कोरोनाच्या व लॉकडाऊनच्या काळात पोलीस यंत्रणेला कोणत्या अडीअडचणी येत असतील तर त्यांनी तात्काळ मला सांगाव्यात जेणेकरुन त्यावर तात्काळ कार्यवाही करणे सोपे जाईल.गृहराज्यमंत्री म्हणून आवश्यक ती सर्व मदत मी करण्यास तयार असून वाढीवच्या मदतीकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेशी संपर्क साधून आपल्या विभागा करीता आवश्यक असणाऱ्या यंत्रणा उभ्या करणेकरीता मी प्रयत्नशील आहे.


            लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सर्व पोलीस यंत्रणा जबाबदारीने कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहणेकरीता उत्कृष्टपणे काम करुन आपले कर्तव्य बजावित आहेत.आजघडीला राज्यातील एक एक पोलीस १४ ते १६ तास आपले कर्तव्य बजावित आहे ही कौतुकास्पद बाब आहे. राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे.कोल्हापुर परिक्षेत्रामध्ये कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच कोल्हापुर, सोलापुर, सांगली, सातारा  व पुणे जिल्हयातील पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोलीस यंत्रणा अलर्ट राहून काम करीत आहे.जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने दिवसरात्र रस्त्यावर उभे राहून पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावित आहेत. हे आपले कर्तव्यच आहे परंतू आपली जबाबदारीही आहे हे ओळखून पोलीस यंत्रणेचे सुरु असलेले काम उल्लेखनीय आहे असे सांगून ना.शंभूराज देसाईंनी लॉकडाऊनच्या काळात महिला पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना रात्रीची डयुटी लावू नये अशी महत्वाची सुचनाही विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांना केली.


 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹    


   सर्व पोलीस यंत्रणेला एखादे विशेष पदक देण्याची विनंती मुख्यमंत्र्याकडे करणार- ना.शंभूराज देसाई.


       कोरोनाच्या पार्श्वभूमिवर निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या काळात दिवसरात्र आपले कर्तव्य बजाविणाऱ्या राज्यातील पोलीस यंत्रणेतील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या पोलीस विभागामार्फत एखादे विशेष पदक देवून त्यांच्या कार्याचा सन्मान करावा, त्यांच्या कामाचे कौतुक करावे अशी विशेष विनंती राज्याचा गृहराज्यमंत्री या नात्याने राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचेकडे करणार असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹