एक कलाकृती कोरोना विरुध्दच्या योदध्यांसाठी चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांचा नावीण्यपूर्ण उपक्रम


तळमावले/वार्ताहर
कोरोनाने देशासह राज्यात थैमान घातले आहे. या विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी अनेकजण युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेत. असे असताना संशयीत व बाधीत रुग्णांवर सुरु असलेले वैद्यकीय उपचार, औषध पुरवठा, गरिबांसाठी आवश्यक अन्न पुरवठा, अत्यावश्यक वैद्यकीय सेवासुविधा तातडीने उभारणी आदी बाबींसाठी मोठया आर्थिक तरतुदींची आवश्यकता आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सहकारी संस्था, सामाजिक संघटना यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी केले आहे. या उपक्रमात आपला खारीचा वाटा देण्यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे. ‘एक कलाकृती कोरोना विरुध्दच्या योदध्यांसाठी’ असे या उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमांर्तंगत आपण आपल्याला हवी असलेले व्यक्तिचित्र डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून रेखाटून घ्यायचे व त्या बदल्यात त्यांना रु.500/- किंवा त्यावर स्वइच्छेने कितीही मुल्य द्यायचे. या उपक्रमांतर्गत जमा होणारी सर्व रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 मध्ये जमा करण्यात येणार आहे. सदर उपक्रम सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने राबवण्यात येत आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांनी यापूर्वीही कलेच्या माध्यमातून पूरस्थिती, नैसर्गिक, राष्ट्रीय आपत्तीच्यावेळी निधी संकलन करुन  शासनाच्या विविध रिलीफ फंडात आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्याच्या लाॅकडाऊनच्या काळात कोरोना प्रतिबंधासाठी मदत निधी संकलनासाठीची संकल्पना डाॅ.डाकवे प्रत्यक्षात उतरवत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे डाॅक्टर, नर्सेस, पोलीस प्रशासन, अधिकारी, सफाई कामगार वास्तव जीवनातील या ‘रियल हिरोंच्याप्रती’ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे.
आपल्याला हवा असलेला व्यक्तीचा फोटो ईमेलवर अथवा व्हाटसअप वर पाठवल्यानंतर डाॅ.संदीप डाकवे त्याआधारे संबंधिताचे काळया रंगाच्या आऊटलाईन मधील आकर्षक रेखाचित्र करुन ईमेल किंवा व्हाॅटसअप करतील. कोरोनामुळे लाॅकडाऊनचे निर्बंध संपल्यानंतर सदर मुळ चित्र संबंधिताना कुरियर अथवा पोस्टेजव्दारे घरपोच केले जाईल.
या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होवून आपले रेखाचित्र चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून काढून घेतल्यास आपली मदत थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 च्या प्रतिबंधासाठी मिळेल तसेच आपले रेखाचित्र आणि स्वतः योगदान दिल्याचे आत्मिक समाधान मिळेल. डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलाकृतींचे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.
एक संवेदनशील कलावंत म्हणून मी कलेच्या माध्यमातून चित्ररुपी खारीचा वाटा देवू शकतो. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळेल असा मला विश्वास आहे. आपल्या कलेचा देशाच्या संकटाच्या कालावधीत उपयोग होवू शकतो यासारखे दुसरे समाधान नाही. अशी भावनिक प्रतिक्रिया इंडिया बुक आॅफ होल्डर चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केली आहे.
सदर चित्राचे मुल्य संदीप राजाराम डाकवे, आयडीबीआय बॅंक, शाखा - कुंभारगांव, खाते क्रमांक - 0625104000046844, आयएफएससी कोड-0000625 या खात्यावर आॅनलाईन जमा करावे किंवा 9764061633 या क्रमांकावरती गुगल पे करावे. तरी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे.

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
कलेच्या माध्यमातून आतापर्यंत समाजासाठी झालेली मदत:
नाम फाऊंडेशनला रु.35,000/- ची मदत.
केरळ पुरग्रस्तांना रु.21,000/- ची मदत.
आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीज ला रु.5,000/- ची मदत
माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना रु.5,000/- ची मदत
मुख्य मंत्री सहाय्यता निधी पुरग्रस्तांना रु.3,000/- ची मदत ची मदत
भारत के वीर या खात्यात रु.1,000/- चा निधी जमा


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹