प्रतिनिधी / कोल्हापूर
देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या अभूतपूर्व आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला शिवाजी विद्यापीठाने सकारात्मक प्रतिसाद दिला. शिवाजी विद्यापीठाने तंत्रज्ञान अधिविभागाचे वसतिगृह आयसोलेशन रुग्णालय उभारण्यासाठी प्रशासनास अधिग्रहणासाठी उपलब्ध करून दिले आहे. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर हे या व्यवस्थेचे समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहणार असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मंगळवारी दिली.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी नुकतीच विद्यापीठाच्या अतिथीगृहामध्ये जिल्हाधिकारी. दौलत देसाई यांच्यासमवेत सविस्तर चर्चा केली. यानंतर या सर्वांनी विद्यापीठातील विविध वसतिगृहांची अधिग्रहणाच्या अनुषंगाने पाहणी केली. त्यानंतर त्यांची कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्यासमवेत चर्चा झाली.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोना विषाणूबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता अतिरिक्त दक्षतेचा उपाय म्हणून उपचारांसाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असून त्या दृष्टीने वसतिगृहांचे अधिग्रहण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
त्यावर कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाच्या विविध वसतिगृहांत सुमारे 3000 विद्यार्थी-विद्यार्थिनी राहतात. लॉकडाऊन उठविल्यानंतर अर्थात 15 एप्रिलनंतर सदर विद्यार्थी स्थगित केलेल्या परीक्षांसाठी पुन्हा वसतिगृहांत दाखल होतील. त्यांची पर्यायी निवास व भोजन व्यवस्था करणे अशक्य असल्याचे जिल्हाधिकाऱयांना सांगितले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अतिरिक्त पर्यायी व्यवस्था म्हणून तंत्रज्ञान अधिविभागाकडील विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृहे अधिग्रहणासाठी उपलब्ध करुन देण्यास सांगितले. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी संमती दिली.
तंत्रज्ञान अधिविभागाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृहांत मिळून एकूण 500 बेडची व्यवस्था आहे. ही वसतिगृहे जिल्हा प्रशासनाला अधिग्रहणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सदर आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करण्यास विद्यापीठ प्रशासन सदैव तत्पर असल्याचेही कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी, वसतिगृहांचे रेक्टर आदींशी चर्चा करून जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार सदर वसतिगृहे हस्तांतरित करण्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक ती व्यवस्था करण्याच्या सूचना कुलगुरूंनी कुलसचिवांना केल्या.
शिवाजी विद्यापीठातील वसतीगृहात आयसोलेशन रुग्णालय .