सातारच्या एसपींची मुलगी म्हणते "पप्पा तिला डबाच द्या"...


सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पातळ्यांवरील समन्वय राखताना कामाच्या व्यापात साताऱ्याच्या एसपी तेजस्वी सातपुते यांना अनेकदा जेवणही वेळेवर करता येत नाही. एकदा दुपारी पावणे पाचच्या सुमारास त्या जेवायला घरी गेल्या तेवढ्यात मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सचा कॉल आला. त्यामुळे त्या तशाच माघारी  फिरल्या. किचनमधून पप्पांसोबत मुलगीही बाहेर आल्यावर आई न दिसल्याने ती खूप रडली. तेव्हापासून एसपींची मुलगी आईची जबाबदारी ओळखून पप्पा तिला रोज डबा द्या, असे म्हणते.
      गेले महिनाभर संपूर्ण जिल्हा प्रशासन कोरोनाविरुद्ध लढाई लढत आहे. त्यामध्ये कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्याची, प्रशा सनाने दिलेल्या नियमानुसार कामकाजांचे
संचलन चालले की नाही, हे पाहण्याची व त्यात गैरप्रकार करणाऱ्यांना धडा शिकवण्याचे काम पोलिस दल पार पाडत आहे. त्यामुळे गेले महिनाभर पोलिस रात्रंदिवस रस्त्यावर उभे आहेत. जिल्ह्यातील सर्व 22 सीमांवर ते तैनात आहेत. 
        रात्रीचा दिवस करणाऱ्या पोलिसांना किमान 12 तासांच्या ड्युटीची मर्यादा आहे. परंतु या सर्व पोलिस दलाचे नेतृत्व करणाऱ्या पोलिस अधीक्षकाला अशा आपत्कालीन परिस्थितीत रात्रंदिवस सजग राहावे लागते. महत्त्वपूर्ण गोष्टींमध्ये रात्री-अपरात्री कधीही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांना कामाच्या वेळांचे कोणतेच बंधन नसते.
      अशाच पद्धतीने सध्या तेजस्वी सातपुते या जिल्हा पोलिस दलाचा कार्यभार सांभाळत आहेत. संपूर्ण जिल्ह्याला घरात बसा असे सांगण्याऱ्या साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंना मात्र, घरात थांबता येत नाही. त्यामुळे त्यांना घरातही सदस्यांपासून सामाजिक अंतर पाळावे लागत  आहे. त्यांची सहा वर्षांची मुलगी आहे. तिलाही त्यांना जवळ घेता येत नाही.
          अशी परिस्थिती निर्माण होणार याची जाणीव असल्यामुळे पती किशोर हेसुद्धा महिनाभरापासून आपले काम बाजूला ठेवून साताऱ्यात थांबले आहेत. कोरोना संसर्गाचा
धोका कामगार व त्यांनाही नको म्हणून घरातील सर्व कामगारही कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे घरातील अगदी सर्व कामांच्या आघाड्यांवर ते स्वत:
कार्यरत आहेत. अगदी स्वयंपाकापासून ते झाडलोटीपर्यंतच्या कामात ते गुंतलेले आहेत. 


आईकडे जाता येत नसल्यामुळे मुलीचीही खाण्यापासूनची सर्व जबाबदारीही तेच पार पाडत आहेत. काही दिवसांपूर्वी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास त्या
जेवायला घरी गेल्या. तेही मुलीने तीन वेळा फोन केल्यानंतर. त्या घरी पोचतात ना पोचतात, तेवढ्यात मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सचा कॉल आला.


त्यामुळे त्या तशाच माघारी फिरल्या. पप्पांच्या मागे किचनमध्ये असलेल्या मुलीला बाहेर आल्यावर त्या दिसल्या नाहीत. त्यामुळे ती खूप रडली.


तेव्हापासून ती चिमुरडीही आईची जबाबदारी ओळखून "पप्पा तिला रोज डबाच द्या" असे म्हणून मागे लागते .