या’ सात गोष्टींचे पालन केले तर आपण कोरोनावर मात मिळवू : PM मोदी


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी भारत 3 मे पर्यंत लॉकडाऊन राहील अशी घोषणा केली. इतर देशांच्या मानाने भारताने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे पुढचे आणखी काही दिवस भारताला कोरोनावर पूर्णपणे काबू मिळवण्यासाठी लॉकडाऊन राहावे लागेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


यावेळी मोदींनी देशातील जनतेची साथ मागितली. तर जनतेला सप्तपदींचं पालन करण्याचं आवाहन केलं. या सप्तपदीमध्ये त्यांनी घरातील वृद्धांची काळजी घ्यायला लावली आहे. सोशल डिस्टन्सिंग व मास्क घालण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर  रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनांचं पालन करा, गरम पाणी, काढा यांचं कायम सेवन करा, असेही मोदी म्हणाले.


कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात मदत करण्यासाठी आरोग्य सेतू मोबाईल ॲप अवश्य डाऊनलोड करा. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी इतरांनाही प्रेरित करा. शक्य तेवढ्या गरीब कुटुंबाची देखरेख करा. त्यांच्या जेवणाची गरज पूर्ण करा.  व्यवसायात, उद्योगात काम करणाऱ्या लोकांच्या प्रति संवेदनशील राहावं. कोणालाही कामावरुन काढू नका. देशाचे कोरोना योद्धे, आपले डॉक्टर-नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांचा पूर्ण आदर, सन्मान करा, अशा सात गोष्टींचे जनतेनी   पालन करावे. धीर ठेवला, नियमांचं पालन केलं तर कोरोनासारख्या साथीच्या रोगावरही मात करु. या विश्वासासोबत मला सात गोष्टींमध्ये तुमची साथ आवश्यक आहे, असं मोदी म्हणाले.