लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे हस्ते अनावरण झालेले सातारा शहरातील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला आज ५८ वर्षे पुर्ण


सातारा  : दि २६ एप्रिल १९६२  रोजी  सातारा जिल्ह्याचे पोलादी नेते व तत्कालीन शेतकीमंत्री (कै.)  लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या हस्ते  सातारा शहरातील पोवई नाक्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण झाले होते. आज या स्मारकाला ५८ वर्षे पुर्ण झाली.
         साताऱ्यात शिवप्रेरणा ज्वलंत राहण्यासाठी पोवई नाका “आठ रस्त्यावर’ छत्रपतींच्या मावळ्यांनी  शिवाजी महाराजांची मूर्ती उभी करण्याचा संकल्प केला होता. त्यातून श्री शिवस्मारक समितीची स्थापना करण्यात आली.  सातारचे शिवप्रेमीदि. मा. घोडके हे अध्यक्ष, तर वि. श्री. बाबर, भ. बा. माने, य. ज. मोहिते, आ. रा. मोरे आदी सभासदांनी मूर्ती उभारणीचा निर्धार केला.
सातारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी हिं. बा. मोहिते, इंजिनिअर या. रा. बोबडे यांनी चबुतऱ्याचे बांधकाम केले. पुणे येथील प्रसिद्ध शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी छत्रपती शिवरायांची मूर्ती तयार केली तत्कालीन शेतकी मंत्री (कै.) बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते २६ एप्रिल १९६२ रोजी या मूर्तीचे अनावरण झाले.सातारा जिल्हा लोकल बोर्डच्या जागेत या मूर्तीची उभारणी करण्यात आली. त्या वेळी जिल्हा लोकल बोर्डाचे दिनकरराव बोडके हे अध्यक्ष होते.५८ वर्षे पूर्ण झालेली छत्रपती शिवरायांची  मूर्ती आजही साताऱ्यातील सर्व जातीधर्माच्या  लाखो मावळ्यांना जनहिताचे ध्येय गाठण्याची, अन्यायाविरोधात लढण्याची आणि सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना व विजय प्राप्त केल्यानंतर पोवई नाका येथे शिवस्मारकासमोर नतमस्तक होण्याची दिशा देत आहेत.पूर्व दिशेला ताठ मानेने उभे असलेल्या  छञपतींचा तोफांवर रुबाबात ठेवलेला डावा हात आणि उजव्या हातात धरलेली भवानी तलवार संघर्षामध्ये मावळ्यांना दोन हात करण्याचे बळ देत आहे. आज पोवई नाक्यावर ग्रेड सेप्रेसशनचे काम झाले असले तरी या शिव स्मारकाची जागा बदलली नाही. युगपुरुषांची जयंती असो की शिवजयंती ,,या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय हो,,ही  घोषणा व पुष्पहार अर्पण करून  छञपतींना मानाचा मुजरा करण्याचा सोहळा पार पडत आहे.निरंतरपणे प्रेरणा देत ५९ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या छत्रपतींच्या स्मारकाने अनेक उन्हाळे -पावसाळे तसेच राजकीय -सामाजिक -सांस्कृतिक-क्रीडा  तसेच शिस्तबद्ध मिरवणूक,मौर्चे अनुभवले आहेत. या स्मारकाचे अनावरण ज्यांनी केले ते पाटणचे दिवंगत बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई गृह राज्यमंत्री म्हणून काम पहात आहेत.विशेष म्हणजे ते वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.त्या जिल्ह्यात एक ही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही . याची ही इतिहासात नोंद झाली आहे