आरोग्य सेतू ॲप सर्वांनी वापरावे
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन
सातारा दि. 22( जि. मा. का ) : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी भारत सरकारने विकसीत केलेले ऑरोग्य सेतू ॲप उपलब्ध करुन दिले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी हे आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन जास्तीत जास्त ॲपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता भारत सरकारने कोविड- १९ ची माहिती सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करुन देण्यासाठी अॅन्ड्रॉईड व आयओएस प्रणाली धारक मोबाईल धारकांसाठी बहुभाषिक एकूण ११ भाषांमध्ये उपलब्ध असलेले आरोग्य सेतू अॅप विकसित केले आहे. या अॅपची सर्वसाधारण वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. हे अॅप ब्ल्युटुथ टेक्नॉलॉजीवर आधारीत आहे. याव्दारे कोविड- १९ बाधीत रुग्णांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाच्या संकलित माहितीच्या आधारे जी.पी.एस. टेक्नॉलॉजीव्दारे कोविड बाधीत रुग्ण आसपास आल्यास (साधारणतः सहा फुटाच्या अंतरावर) वापरकर्त्यास धोक्याची सूचना देते. या अॅप मध्ये कोविड- १९ बाधेची स्वः चाचणी सुविधा, प्रतिबंधात्मक उपाययोजना, सामाजिक अंतर बाळगणे व प्रतिबंधासाठी काय करावे किंवा काय करु नये याबाबतची प्रमाणित माहिती वापरकर्त्यास मिळते. स्वः चाचणीमध्ये वापरकर्ता अति धोकादायक स्थितीत आढळल्यास या अॅपव्दारे जवळच्या कोविड तपासणी केंद्राचा क्रमांक उपलब्ध करुन दिला जातो. अथवा तात्काळ १०७५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याबाबत वापरकर्त्यास या अॅपव्दारे सुचविण्यात येते. या अॅप व्दारे कोविड- १९ बाधेच्या अनुषंगाने वापरकर्त्याच्या सर्वसाधारण प्रश्नांची प्रमाणित उत्तरे दिली जातात. तसेच, सर्व राज्यातील हेल्प लाईन क्रमांक उपलब्ध करुन दिले जातात. या ॲप व्दारे लॉक डाऊन काळात वापरकर्त्यास अपरिहार्य परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासल्यास ई- पास व्दारे अर्ज करुन पास मिळविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. हे अॅप पुढीलप्रमाणे डाऊनलोड करण्याची सुविधा आहे.
आयओएस मोबाईल सिस्टीमसाठी: itms-apps://itunes.apple.com/app/id५०५८२५३५७ व
ॲण्ड्रॉईड मोबाईल सिस्टीमसाठी: https://play.google.com/store/appes/details?id=nic.goi.arogyasetu
हे ॲप कोविड- १९ बाधित रुग्णांचे संकलित केलेल्या भ्रमणध्वनी वापरकर्त्याच्या कक्षेत आल्यानंतर धोक्याची सूचना देत असल्याने, आपल्या अधिपत्याखालील क्षेत्रातील सर्व कोविड-१९ बाधित रुग्ण, संशयीत रुग्ण, विलगीकरण व अलगीकरण असलेल्या तसेच रुग्णालयातून उपचारअंती सोडून देण्यात आलेले सर्व नागरीकांचे भ्रमणध्वनी क्रमांक संकलित करावे. तरी जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयातील तसेच महसुल, पोलीस, आरोग्य, नगर पंचायत, नगर परिषद इत्यादी विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी सदरचे अॅप डाऊनलोड करुन घ्यावयाचे आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व सक्षम प्राधिकाऱ्यांनी त्यांचे आधिकार क्षेत्रामध्ये कोविड- १९ बाधित रुग्ण, विलगीकरण कक्षातील सर्व रुग्ण, संस्थामध्ये अलगीकरण करण्यात आलेले सर्व संशयीत बाधित रुग्ण, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेले बाधा मुक्त नागरीक तसेच, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर्स, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी यांनाही जनहितार्थ हे अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करण्याबाबतच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा यांनी सर्व संबंधितांना द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.