कराड : महारुगडेवाडी (ता. कराड) येथील कृष्णा रुग्णालयात दाखल असलेल्या काेराेना बाधित रुग्णाचा आज पहाटे (शनिवार) मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील काेराेना बाधिताचा हा दूसरा बळी ठरला आहे. तर कराड तालुक्यात कोरोना बाधितचा पहिला बळी झाल्याने नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान प्राथमिक अंदाजानुसार कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
कराड तालुक्यातील महारुगडे वाडी येथील संबंधित व्यक्ती मुंबई येथे वास्तव्यास होती. ती व्यक्ती आपल्या नातेवाईक रिक्षांमधून मुलीसह दोन नातवंडा बरोबर गावाकडे आली होती. त्यानंतर त्यांना त्रास होत असल्याने ही व्यक्ती जवळपासच असलेल्या एका खासगी रुग्णालयात गेली असता या व्यक्तीची लक्षणे कोरोना सदृश असल्याने खासगी डॉक्टरांनी त्यांना तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सदर व्यक्तीने दुसऱ्या एका खाजगी रुग्णालयात जाऊन तात्पुरते उपचार घेतले. तरीही त्रास वाढत असल्याने मागील चार दिवसापूर्वी ही व्यक्ती कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल झाली त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथे पाठवले हाेते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरु हाेते. मात्र आज (शनिवार) त्यांचा मृत्यू झाला. संबंधितांवर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून त्याची सध्या तयारी सुरू आहे.
दरम्यान कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासीत 13 जणांना फलटण तालुक्यातील क्वारंटाईन फॅसिलिटी केंद्रामध्ये व श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे अशा विविध आजारांमुळे 11 अनुमानितांना शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या सर्व 24 जणांचे घाशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपसणीसाठी पाठविण्यात आले होते.
या सर्व 24 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे .