5 दिवसात 190 स्वस्त धान्य दुकानांची तपासणी  17 स्वस्त धान्य दुकान दुकानांवर कारवाई  

 



  सातारा दि. 17(जिमाका) :  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी असताना लाभार्थ्यांना रेशन धान्य मिळण्याबाबत असलेल्या तक्रारी यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर व तालुकास्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही भरारी पथके तक्रारी प्राप्त झालेल्या दुकाने, संवेदनशील दुकाने यांना भेटी देवून तपासणी करीत आहेत.तसेच तक्रारींचे निराकरण करीत आहेत. गेल्या 5 दिवसात 190 स्वस्त धान्य दुकान तपासणी करण्यात आली असून, 17 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये जादा दराने धान्य विकणे व विहीत परिमाणापेक्षा कमी धान्य देणे या कारणास्तव 3 स्वस्त धान्य दुकाने रद्द करणेत आली असून 1 दुकान निलंबित करणेत आले आहे तसेच 2 तक्रारींवर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.
  सातारा जिल्हयामध्ये एकूण 11 तालुक्यामध्ये 1681 स्वस्त धान्य दुकाने आहेत चालू महिन्याचे म्हणजे एप्रिल 2020 मध्ये 5460 मे.टन गहू व 3398 मे.टन.तांदूळ नियमित धान्य वाटप झाले असून, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्राधान्य कुटूंब लाभार्थी व अंत्योदय योजनेतील प्रती लाभार्थी 5 कि.मोफत तांदूळ वाटप करण्यात येत आहे. केशरी रेशनकार्ड धारकांना माहे मे पासून प्रति सदस्य 3 कि.गहू  रु.8/- प्रमाणे व 2 कि. तांदूळ रु.12/-प्रमाणे वाटप केला जाणार आहे. 
   
23 ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरु


  जिल्हा व तालुका स्तरावर एकूण 23 ठिकाणी शिवभोजन  केंद्र सुरु केले असून गरीब व गरजू लोकांसाठी 11 ते 3 या वेळेत प्रती माणशी  रु.5/-प्रमाणे थाळी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर 23 केंद्रावर अंदाजे 1800 गरीब व गरजू लोक भोजनाचा लाभ घेत आहेत. 
  पात्र रेशनकार्डधारकांना धान्य मिळण्यास अडचणी आल्यास तक्रार निवारण करणेसाठी अत्यावश्यक सेवा मदत क्र.1077 (हेल्पलाईन) वेळ सकाळी 9.00 ते रात्री 9.00 उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच जिल्हा पुरवठा कार्यालयातील दूरध्वनी क्र.02162-234840 यावरही तक्रारी नोंदविता येतील. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी असताना धान्य वाटपात गैरप्रकार करणारे स्वस्त धान्य दुकानदार यांचेवर जिवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गंभीर कारवाई करण्यात येईल, अशीही माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली .