यशवंत बँकेचा २८८ कोटींचा संमिश्र व्यवसाय  बँकेस १ कोटीचा ढोबळ नफा : शेखर चरेगावकर


कराड/प्रतिनिधी


नुकत्याच झालेल्या २०१९-२० या आर्थिक वर्षात यशवंत बँकेला १ कोटीचा ढोबळ नफा झाला आहे. बँकेचा एकत्रित व्यवसाय २८८ कोटी इतका झाला असून यामध्ये १६४ कोटींच्या ठेवी तर १२४ कोटींची कर्जे वितरीत केली आहेत. बँकेची गुंतवणूक रु.५० कोटी इतकी आहे.


मागील आर्थिक वर्षात अतिवृष्टी, महापूर व कोरोना संसर्गामुळे बाजारपेठेत मंदीचे वातावरण राहूनही बँकेने नफा मिळवण्यात सातत्य राखले आहे अशी माहिती यशवंत बँकेचे चेअरमन शेखर चरेगांवकर यांनी दिली.


बँकेचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली, पुणे, रत्नागिरी व सोलापूर या जिल्ह्यांचे असून सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने बँकेच्या भागभांडवलात व व्यवसायात समाधानकारक वाढ झाली आहे. लेखापरीक्षण वर्गात सातत्य राखण्यासाठी आवश्यक प्रमाणके बँकेने पूर्ण करून ठेवली आहेत.


सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक व पतसंस्थांसाठी ठेवीच्या व कर्जांच्या आकर्षक योजना मागील वर्षात बँकेने राबिविल्या त्यास ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. नव्या वर्षात छोट्या उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी कमी व्याजदराच्या कर्ज योजना सुरु करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


बँकेच्या पिग्मी ठेव योजनेसही ग्राहकांनी पसंती दिली आहे. सध्या बँकेचे १२ पिग्मी एजंट कार्यरत आहेत. या ठेवीदारांना त्यांच्या पिग्मी खात्यावर किमान रुपये २५ हजार ते कमाल रुपये १ लाख २५ हजारापर्यंत कर्ज दिले जाते. पिग्मीमधूनच कर्जाची परतफेड केली जाते.


महिला बचत गट कर्जे, महिला गृहउद्योग, उत्पादने विक्री केंद्रे, व्यवसाय मार्गदर्शन यासारख्या विविध कार्यक्रमांबरोबरच यशवंत महोत्सवासारख्या सांस्कृतिक उपक्रमातून बँकेने आपली सामाजिक बांधिलकी जपल्याचे त्यांनी सांगितले.


बँकेच्या प्रगतीसाठी सहकार्य करणारे ठेवीदार, ग्राहक, संचालक, सल्लागार, सेवक व विकास अधिकारी यांना चरेगांवकर यांनी धन्यवाद दिले .