मुंबई : घटनात्मक पेच टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचा ठराव राज्यमंत्रीमंडळाने आज मंजूर केला.
ठाकरे हे विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सध्या सदस्य नाहीत. त्यांना २६ मे पूर्वी आमदार होणे आवश्यक आहे. मात्र, विधानपरिषदेच्या निवडणुका कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे ठाकरे २६ मे पूर्वी आमदार होणार की नाही, याची शंका घेतली जात होती.
मात्र, राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त झाल्याने त्यापैकी एका जागेवर ठाकरे यांची शिफारस करण्यात आली. एखाद्या मुख्यमंत्र्याने स्वतःच आपल्या नावाची शिफारस आमदार म्हणून केल्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. राज्यपाल आता ठाकरे यांची शिफारस स्वीकारणार का? याची उत्सुकता आहे.