कृष्णा साखर कारखान्याची हॅन्ड सॅनीटायझर ची निर्मिती: डॉ: सुरेश भोसले.


 कराड दि. 1 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणार्‍या हॅन्ड सॅनिटायझरला प्रचंड मागणी वाढल्याने बाजारात त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच काही ठिकाणी त्याची चढ्या दराने विक्री केली जात असल्याने सर्वसामान्यांना हॅन्ड सॅनिटायझर मिळणे दुरापास्त झाले आहे. यावर तोडगा म्हणून आता रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्यात तयार झालेले हे हॅन्ड सॅनिटायझर सर्व सभासदांना मोफत घरपोच वितरित केले जाणार असल्याची माहिती चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली आहे.
कोराना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रभावी उपाययोजना आखल्या आहेत. शिवाय लोकांनी स्वयंस्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले जात आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी हॅन्ड वॉश, साबण अथवा हॅन्ड सॅनिटायझरने नियमितपणे हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. पण हॅन्ड सॅनिटायझरची प्रचंड मागणी वाढल्याने, बाजारात त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा स्थितीत साखर कारखान्यांनी हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन घ्यावे यासाठी शासनस्तरावरून आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत कृष्णा सहकारी साखर कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन घेण्याची तयारी दर्शवित शासनाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार शासनाच्या अन्य व औषध प्रशासनाकडून कारखान्यास नुकतेच परवानगीचे पत्र देण्यात आलेे. त्यानंतर कारखाना प्रशासनाकडून हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून, अत्यल्प वेळेत हे उत्पादन घेण्याचा निर्धार केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार तयार करण्यात येणारे हे हॅन्ड सॅनिटायझर लवकरच बाजारात उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी स्पष्ट केले.
सभासदांना मोफत वितरण
कोरानाचा प्रसार रोखण्यासाठी कृष्णा कारखाना प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून, सर्व कर्मचार्‍यांना यापूर्वीच मास्क व हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहेत. आता  कारखान्याने स्वत: हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन घेण्यास प्रारंभ केला असून, कारखान्याच्या सभासदांचे आरोग्यहित लक्षात घेऊन सर्व सभासदांना हे हॅन्ड सॅनिटायझर घरपोच मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. अशी माहिती चेअरमन  डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.