आदिवासी भागात झाडांच्या पानांचे मास्क , कोरोना रोखण्यासाठी खबरदारी.


रायपूर (छत्तीसगड) : देशभरात कोरोनाचा फैलाव वाढल्याने सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. संसर्ग वाढू नये म्हणून देश तब्बल २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केला आहे. अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधून बाहेर पडत आहेत. त्यामुळे सध्या जो तो मास्क बांधलेला दिसतो. मात्र तिकडे गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील आदिवासी भागात वेगळंच चित्र दिसून आलं.


आदिवासी नागरिकांकडे आरोग्य सुविधा पोहोचल्याच नसल्याने, इथल्या नागरिकांना चक्क झाडांच्या पानांचे मास्क बनवून वापर करावा लागत आहे. नाका-तोंडाला झाडांची पाने बांधून, हे नागरिक संसर्गापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत.


छत्तीसगडमधील अबुझमाड हा घनदाट जंगल परिसर आहे. या जंगलाला माओवांद्यांची राजधानी असंही संबोधलं जातं. इथ अनेक आदिवसाी राहतात. मात्र या आदिवासी नागरिकांपर्यत प्रशासनाच्या सुविधा पोहोचत नाहीत.


या नागरिकांपर्यंत कोरोना व्हायरसची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:हून खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. हा अतिसंवेदलशील आणि नक्षलग्रस्त भाग असल्याने, इथे कुणी मास्क वाटप करणे शक्य नाही. त्यामुळे छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील आमाबेडा परिसरातील भर्रीटोला गावात, लोकांनी झाडांच्या पानांपासून मास्क बनवून ते वापरण्यास सुरुवात केली.


इथल्या गावात सभा आयोजित करुन कोरोनाविषयी माहिती देत आहेत. कोरोनामुळे मास्कचा तुटवटा असला तरी आदिवासी समाजाने पानांपासून तयार केलेल्या मास्कचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


दुर्गम भागातील नागरिक कोरोनाबाबत खबरदारी घेत असताना, इकडे शहरातील नागरिकांना मात्र त्याबाबत गांभीर्य नसल्याचं दिसून येत आहे. कारण लॉकडाऊन असून अनेकजण रस्त्यावर फेरफटका मारताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना श्रम आणि वेळ वाया घालवावं लागत आहे.